मुंबईत विशेषत: उपनगरात बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत असून त्यांची ओळख पटवण्यासाठी उपनगरात २४ विधानसभा मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी या समित्या काम करतील असेही त्यांनी सांगितले.

उपनगरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने २४ विधानसभा मतदारसंघनिहाय समित्या स्थापन केल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मुंबई महापालिका मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही माहिती दिली. लोढा यावेळी म्हणाले की, विशेषत: मालाड आणि जोगेश्वरी परिसरात फेरीवाले व मजूर म्हणून मोठ्या संख्येने बांगलादेशी राहत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेकांकडे जन्म प्रमाणपत्र किंवा आधारकार्ड अशी ओळखपत्रे देखील नाहीत, अशाही तक्रारी येत आहेत. त्यामुळे उपनगरातील २४ विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी एक अशा २४ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या संबंधित भागातील संशयितांची ओळख पटवण्याचे काम करतील. तसेच या समित्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक विशेष समिती देखील स्थापन करण्यात आली असून ती दरमहा अहवाल सादर करणार आहे.

मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येताच बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा महापौर रितू तावडे यांनी दिला होता. बेकायदेशीर राहणाऱया बांगलादेशींना मुंबईतून घालवणे हेच आमचे उद्दीष्ट्य असेल, मुंबईत विविध ठिकाणी पदपथांवर अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांगलादेशींचे जात प्रमाणपत्र आणि बोगस आधारकार्ड शोधून त्यावर त्वरित कारवाई करून त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात येईल, अशी घोषणा महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारताच केली होती. तसेच बांगलादेशी फेरीवाल्यांना हटवण्याला प्राधान्य देत प्रशासनाबरोबर त्यांनी पहिली सभा याच विषयावर घेतली. त्यानंतर बांगलादेशी मजूरांना हुडकून त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी गोरेगावमधील भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी केली होती. तर आता लोढा यांनी याबाबत समित्या स्थापन केल्याचे सांगितले.

रेल्वे स्थानक परिसरावर अधिक लक्ष

जोगेश्वरी, अंधेरी, मालाड आदी पश्चिम उपनगरातील प्रमुख रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या स्वरुपात बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढल्याच्या तक्रारी येत असल्याचे लोढा यांनी सांगितले. तसेच विविध प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजूरांबाबतही शंका व्यक्त केल्या जात असल्याचे लोढा यांनी सांगितले. तसेच ओळख पटवलेल्या बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई करण्यात येईल असेही लोढा यांनी सांगितले. बांगलादेशी फेरीवाले व मजूर यांच्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना त्रास होत असल्याच्याही तक्रारी येत असल्याचे लोढा यांनी सांगितले.