मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सुरत रेल्वे स्थानकात पायाभूत आणि प्रवासीभिमुख सुविधा वाढवण्यात येत आहेत. येथे नवीन फलाटांची उभारणी केली जात आहे. हे फलाट प्रामुख्याने उपनगरीय रेल्वेगाड्यांसाठी वापरले जातील. त्यामुळे लवकरच या मार्गावरून उपनगरीय प्रवासासाठी अद्ययावत ‘नमो भारत’ रेल्वेगाड्या, ‘इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स’ (इएमयू) लोकल किंवा अद्ययावत मेमू गाड्या चालवल्या जाण्याची दाट शक्यता आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासन सुरत येथे एक उपनगरीय रेल्वे प्रणाली विकसित करत आहेत. ही रेल्वे मार्गिका एका बाजूला मुंबईला आणि दुसऱ्या बाजूला अहमदाबादला जोडण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, सुरत रेल्वे स्थानकावर केवळ उपनगरीय रेल्वेगाड्यांसाठीच समर्पित असे नवीन फलाट उभारण्याची योजना आहे. हे उपनगरीय फलाट एकदा तयार झाले की, सुरतपासून वलसाड, डहाणू, विरार आणि अहमदाबादच्या दिशेने उपनगरीय रेल्वेगाड्या चालवणे शक्य होईल. पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, ‘नमो भारत’सारख्या गाड्यांच्या माध्यमातून ज्यामध्ये वातानुकूलित आणि सामान्य डब्यांचा समावेश असतो. तसेच प्रसाधनगृहांची सुविधाही असते. त्यामुळे उपनगरीय सेवा सुरू करण्याचा विचार निश्चितपणे केला जाऊ शकतो.

‘नमो भारत’ उच्च वेगासाठी, उत्तम आसन व्यवस्थेसाठी आणि आधुनिक सुविधांसाठी ओळखली जाते. पश्चिम रेल्वेवर सध्या अहमदाबाद आणि भुज दरम्यान ‘नमो भारत’ सेवा चालवत आहे. ज्यामुळे या मॉडेलचे यश अधोरेखित होते. या गाड्या तुलनेने अधिक अंतराच्या प्रवासासाठी उपयुक्त आहेत. तसेच, प्रसाधनगृहे, रुंद दरवाजे यासारख्या सुविधांनी सज्ज असल्याने त्या नेहमीच्या अन्य लोकलच्या तुलनेत अधिक आरामदायी आहेत.

लोकलऐवजी ‘नमो भारत’वर भर

लांब पल्ल्याच्या उपनगरीय रेल्वेगाड्या चालवण्यातील मुख्य अडचण म्हणजे गाड्यांमध्ये प्रसाधनगृहांची अनुपलब्धता. इएमयू लोकलमधून तीन तासांपेक्षा अधिक काळाचा प्रवास करणे शक्य होत नाही. मात्र, ‘नमो भारत’ आणि सुधारित ‘मेनलाइन इएमयू’ गाड्यांच्या वापरामुळे, या दोन शहरांना उपनगरीय रेल्वे प्रणालीद्वारे जोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या विरार-सुरत दरम्यान मेमू’ गाड्या चालविण्यात येत आहेत. या प्रवासाला ५ तासांहून अधिक वेळ लागत असून या दोन शहरांमधील ३० स्थानकांवर या गाड्या थांबतात. या गाडीच्या दिवसाला केवळ दोनच फेऱ्या होतात. मात्र, उपनगरीय गाड्यांसाठी नवीन फलाटांची उभारणी होत असल्याने आणि अधिक चांगल्या दर्जाच्या गाड्या सेवेत दाखल होणार असल्याने, या सेवांचा विस्तार करून त्या थेट मुंबईपर्यंत आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर मुंबई – सुरतदरम्यान अशी उपनगरीय सेवा सुरू झाली, तर हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. हे विशेषतः कार्यालयीन कर्मचारी आणि लहान व्यावसायिक प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल. याव्यतिरिक्त, यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि दोन्ही शहरांमधील एकूण प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे.

सध्या पश्चिम रेल्वे आणि सुरत एकात्मिक वाहतूक विकास महामंडळ सुरत रेल्वे स्थानकात सुधारणा करत आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने बुधवारी सांगितले की, १५०० कोटी रुपये खर्च करून सुरत स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. ही कामे डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होतील. सध्या ४६ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ज्यामध्ये उन्नत रस्त्यांची जोडणी आणि भूमिगत मेट्रो रेल्वे आदींचा समावेश आहे. हे बुलेट ट्रेन स्थानक आणि सुरत विमानतळालाही जोडण्यात येणार आहे. याच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ७२ एकर जमिनीवर व्यावसायिक टॉवर्स, मल्टिप्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कर्मचारी निवासस्थाने आणि कार्यालयांसाठी जागा बांधण्यात येणार आहे.