मुंबई : मागील काही दिवसांपासून अधूनमधून पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, मध्येच पडणारे कडक ऊन यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. साथीच्या आजारांमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांची अधिक असून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्याही वाढत झाल्याचे निदर्शनास आले आहे.

पावसाळा सुरू झाला की हिवताप, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. मागील आठवडाभरापासून मुंबईमध्ये अधूनमधून पाऊस पडत असला तरी वातावरणातही मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. अनेक वेळा सकाळी ढगाळ वातावरण, तर दुपारी कडक ऊन पडते. वातावरणातील या बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मुंबईकर सर्दी, तापाने हैराण झाले आहेत. या रुग्णांची हिवताप, डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण फारसे नाही. मात्र बदलत्या वातावरणामुळे मुंबईमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या रुग्णांची तपासणी केल्यानंतर स्वाईन फ्ल्यूचे काही रुग्ण आढळून आलेत. तसेच मुंबईच्या काही भागांमध्ये मे महिन्यांपासून हिवतापाचे रुग्ण आढळून येत असल्याचे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.

हेही वाचा…ठाणे, पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा

मागील काही दिवसांमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच हिवतापाचे महिनाभरातही दोन ते तीन रुग्ण सापडले असल्याची माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनच्या मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिली. जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये हिवतापाचे १६१२ रुग्ण, तर डेंग्यूचे ३३८, चिकनगुनिया २१ आणि हेपेटायटिसचे २४८ रुग्ण सापडले आहेत.