पश्चिम बंगाल विशेष कृती दलाने (एसटीएफ) महाराष्ट्र दहशतवाद विरोधीत पथकाच्या (एटीएस) मदतीने वांद्रे परिसरातून एका ३४ वर्षीय तरूणाला शनिवारी अटक केली. आरोपी प्रतिबंधीत दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. याप्रकरणी पश्चिम बंगालमधूनही एका तरूणाला अटक करण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबईः तेरा कोटींच्या कोकेनसह परदेशी नागरिकाला अटक

सद्दाम हुसैन खान (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला वांद्रे येथील निर्मल नगर परिसरातून एसटीएफने अटक केली. तो मूळचा पश्चिम बंगाल येथील डायमंड हार्बर जिल्ह्यातील अब्दुलपूर येथील रहिवासी आहे. पारुलिया कोस्टल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा खान हा जिहादी दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. तसेच तरूणांची माथी भडकवण्यामध्ये सहभागी होता. एटीएसच्या मदतीने आरोपीला शनिवारी निर्मल नगर परिसरातून अटक करण्यात आली. पश्चिम बंगाल एसटीएफने याप्रकरणी समील हुसैन शेख (३०) या आरोपीलाही याप्रकरणी पश्चिम बंगाल येथील डायमंड हार्बर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून संशयीत दहशतवाद्याची अटक होणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. यापूर्वी मुंबई जवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याच्या हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर गेल्या आठवड्यात माय लेडी हान नावाची ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीत तीन एके ४७ रायफल, काडतूसे, चाॅपर असा शस्त्रसाठा सापडला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश होते. त्यामुळे मुंबई पोलिसांसह तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी संरक्षणात्मक उपाय म्हणून मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरील गस्त आणि सुरक्षा वाढविली आहे.