घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवली यांसारख्या भागांनंतर आता दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरातही ‘मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही’ अशा आशयाची जाहिरात करणाऱ्या एका रिअल इस्टेट एजंटच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर जोरदार वाद पेटला आहे. या तीव्र वादानंतर संबंधित इस्टेट एजंट भावेश कावरे याने आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे. “मी स्वतः मराठी माणूस असून माझे चिकनचे दुकान आहे; तसेच तो फ्लॅट एका वारकऱ्याचा होता,” असा दावा करत त्याने हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमका वाद काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे याने ताडदेव येथील एका आलिशान नव्या हाय-राईज इमारतीतील फ्लॅटची जाहिरात करताना एका अटीचा उल्लेख केला होता. “तुम्ही मांसाहार करत असाल, तर तुम्हाला इथे घर मिळणार नाही. फक्त शाकाहारी व्यक्तींनाच हा फ्लॅट मिळेल,” असे विधान त्याने केले होते.

या विधानानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक शहरात घर खरेदी करताना किंवा भाड्याने घेताना व्यक्तीच्या खानपानाच्या सवयींवरून होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

“तो फ्लॅट वारकऱ्याचा होता…” भावेश कावरेचा दावा काय?

प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता वाद पाहता, ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना भावेशने आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटले. “८० टक्के लोक मांसाहार करतात, तर २० टक्के लोक पूर्ण शाकाहारी आहेत. हा व्हिडिओ केवळ त्या २० टक्के शाकाहारी लोकांसाठीच बनवला होता. काहींना मांसाहाराचा वासही सहन होत नाही. ज्यांचा तो फ्लॅट होता, ते गृहस्थ मराठी असून वारकरी संप्रदायातील आहेत. आपली वास्तू केवळ शाकाहारी व्यक्तीलाच मिळावी, ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा होती. अखेर हा फ्लॅट एका मराठी व्यक्तीनेच खरेदी केला आहे,” असे भावेश कावरेचे स्पष्टीकरण आहे.

“माझे स्वतःचे चिकनचे दुकान आहे”

आपल्यावर लागलेले भेदभावाचे आरोप फेटाळताना भावेश कावरे म्हणाला, “आमचे स्वतःचे गेल्या ४० वर्षांपासून चिकनचे दुकान आहे. त्यामुळे मी मांसाहाराच्या विरोधात असण्याचा किंवा मांसाहारी लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्नच येत नाही. फ्लॅट कोणाला विकायचा किंवा भाड्याने द्यायचा, हा पूर्णपणे घरमालकाचा निर्णय असतो; इस्टेट एजंटचा त्यावर कोणताही अधिकार नसतो. व्हिडिओमध्ये मी कुठेही ‘मराठी’ असा उल्लेख केला नव्हता. काही लोक जाणूनबुजून या विषयाचा राजकीय मुद्दा बनवत आहेत.”

मनसेकडून पोलिसांत तक्रार

मुंबईतील ताडदेव परिसरात एका इस्टेट एजंटने ‘केवळ शाकाहारी लोकांनाच घर दिले जाईल’ अशी जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित केल्याने नवा वाद पेटला आहे. यावरून अन्नाच्या सवयींवर आधारित भेदभाव आणि सामाजिक तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हा प्रकार संविधानाच्या कलम १४, १५, १९ आणि २१ चे उल्लंघन असल्याचे मनसेने म्हटले आहे. पोलिसांनी संबंधित इस्टेट एजंटवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अन्यथा मनसे स्वतः त्याला ‘मनसे प्रसाद’ देईल, असा आक्रमक इशारा तक्रार पत्राद्वारे देण्यात आला आहे.

धमक्यांवरून व्यक्त केली नाराजी

राजकीय वर्तुळातून येणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांवर भावेश कावरेने नाराजी व्यक्त केली आहे.

“मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. महाराजांच्या राज्यातही शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रवृत्तीचे/सवयींचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. मी स्वतः मराठी उद्योजक असून लोकांना रोजगार देतोय. असे असूनही काही नेते ‘दिसेल तिथे ठोका’ अशा धमक्या देत आहेत. मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतोय,” अशी खंत त्याने व्यक्त केली.

वाढता वाद आणि सोशल मीडियावरील तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन भावेश कावरेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तो वादग्रस्त जाहिरातीचा व्हिडिओ अखेर हटवला (डिलीट केला) आहे.