मुंबई : कर्करोगाच्या उपचारादरम्यान केस गळाल्याने आत्मविश्वास व भावनिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उच्च दर्जाचे नैसर्गिक मानवी केसांचे टोप (विग) मोफत उपलब्ध करून देण्यासाठी टाटा स्मारक केंद्र (टीएमसी) आणि द चेरियन फाऊंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे. चेरियन फाऊंडेशनकडून टाटा रुग्णालयाला सुमारे १.५ कोटी रुपयांचे ५०० उच्च दर्जाचे नैसर्गिक मानवी केसांचे विग देण्यात येणार आहे.
कर्करोगाच्या उपचारांमध्ये केमोथेरपीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या उपचारांचा सहज दिसणारा दुष्परिणाम म्हणून केस गळण्याची समस्या अनेक रुग्णांना जाणवते. विशेषतः स्तन व स्त्रीरोगविषयक कर्करोगाच्या रुग्णांमध्ये या समस्येचा मानसिक व सामाजिक परिणाम होऊ शकतो. केस गळल्यामुळे आत्मविश्वास कमी होणे, सामाजिक न्यूनगंड निर्माण होणे व भावनिक ताण वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे काही रुग्ण उपचारांपासून दूर जाण्याची शक्यताही असते.
ही बाब लक्षात घेत टाटा रुग्णालयाने अशा रुग्णांना केसांचा विग मोफत उपलब्ध व्हावा यासाठी चेरियन फाऊंडेशनशी करार केला आहे. या करारानुसार चेरियन फाऊंडेशनच्या ‘गिफ्ट हेअर गिफ्ट कॉन्फिडन्स’ या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला ५०० विग टाटा रुग्णालयाला देणार आहे. देशभरातील टाटा स्मारक केंद्राच्या विविध संस्थांमध्ये रुग्णांच्या गरजेनुसार या विगचे वितरण करण्याची जबाबदारी मुंबईतील टाटा रुग्णालयावर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, नैसर्गिक मानवी केसांपासून उच्च दर्जाचे विग तयार करण्याची जबाबदारी राज हेअर इंटरनॅशनलने स्वीकारली आहे. कर्करोगाच्या उपचारांमध्ये रुग्णाचे आयुष्य वाढवण्याबरोबरच त्याच्या जीवनमानाकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. उच्च दर्जाचे नैसर्गिक मानवी केसांचे विग रुग्णांना उपचाराच्या काळात सन्मान व आत्मविश्वास टिकवून ठेवण्यास मदत करतील, असा विश्वास टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी सांगितले.
उच्च दर्जाचे नैसर्गिक केसांचे विग आत्मविश्वास परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरतात. मात्र, या विगचा खर्च आरोग्य विम्यात समाविष्ट नसल्याने अनेकांना तो परवडत नाहीत. त्यामुळे या भागीदारीद्वारे सर्वसामान्यांना विग मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे टाटा रुग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाच्या (स्तन कर्करोग विभाग) प्राध्यापक डॉ. शलाका जोशी यांनी सांगितले.
दरवर्षी एक हजार विग उपलब्ध करण्याचे आश्वासन ‘गिफ्ट हेअर गिफ्ट कॉन्फिडन्स’ हा उपक्रम २०१४ मध्ये सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुरुवातीला ५०० विग देण्यात येत असले तरी दरवर्षी एक हजार विग पुरविण्याचे आश्वासन चेरियन फाऊंडेशनकडून देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३० हजारांहून अधिक केसदाते जोडले गेले असून, देशभरातील ३५ हून अधिक भागीदार रुग्णालयांच्या माध्यमातून २,५०० हून अधिक उच्च दर्जाचे नैसर्गिक मानवी केसांचे विग मोफत वितरित करण्यात आले आहेत.
