मुंबई : धारावी, वरळीसारख्या पुनर्विकास प्रकल्पांबरोबरच भविष्यात मुंबई महानगर प्रदेशात येणाऱ्या विदा (डाटा) केंद्रांमुळे शहराची ऊर्जेची वाढती गरज भागविण्याकरिता टाटा पॉवरने मुंबईतील वीज पारेषण जाळे (ट्रान्समिशन नेटवर्क) विस्ताराची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. याकरिता संपूर्ण शहरभर विक्रोळी, धारावी, महालक्ष्मी, शिवडी आणि ट्राम्बे यांना जोडणारे ४०० केव्ही रिंग नेटवर्क उभारले जाणार आहे. पारेषण जाळे सक्षम झाल्यास धारावी, वरळीसारख्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणारी विजेची वाढती गरज भागविणे शक्य होईल. थोडक्यात अदानींच्या धारावी पुर्नविकासाला भविष्यात टाटांच्या वीज पारेषणाचे बळ मिळणार आहे.

हे जाळे कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वीज आणून तिचे वितरण विनासायास करणे शक्य होईल. याकरिता पुढील पाच वर्षात सुमारे १५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती टाटा पॉवरचे पारेषण आणि वितरण प्रमुख (मुंबई) डॉ. निलेश काणे यांनी दिली.वीज पारेषण जाळे बळकट करण्याकरिता नऊ नवीन अतिरिक्त उच्च व्होल्टेज उपकेंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच सध्याच्या आठ ११० केव्ही केंद्रांची क्षमता वाढवून ती २२० केव्हीवर नेली जाईल. पुढील पाच वर्षात म्हणजे २०३१ पर्यंत ही योजना प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा काणे यांनी व्यक्त केली.

विदा केंद्रांमुळे विजेची गरज वाढणार

नवी मुंबईत मोठ्या संख्येने विदा केंद्र येत आहेत. याकरिता हरित ऊर्जा वापराचे बंधन आहे. तेही आता शिथील केले गेले आहे. या केंद्रांना ५० ते ७० टक्के ऊर्जा बाहेरून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता मुंबईतील वीज पारेषणाचे जाळे भक्कम करावे लागेल.

पारेषण जाळे भक्कम करण्याची गरज का?

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या वीज मागणीत सुमारे १० टक्के वाढ नोंदविली गेली आहे. सध्या मुंबईची विजेची मागणी ४६४२ मेगावॉटच्या आसपास असून २०३१ पर्यंत ६५०० मेगावॉटपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. वाढता पुनर्विकास, विदा सेंटर, मेट्रो नेटवर्कचा विस्तार, पायाभूत सुविधा यांमुळे ही मागणी वाढणार आहे. विजेची वाढती गरज भागविण्याकरिता राष्ट्रीय ग्रीड आणि मोठ्या प्रमाणावरील अक्षय ऊर्जा स्त्रोतांतून मिळणारी वीज स्वीकारून ती महानगरातील विविध भागांत पोहोचविण्याकरिता भक्कम पारेषण जाळे आवश्यक आहे. मुंबई महानगरात उभे राहणारे हे देशातील एकमेव मॉडेल असेल, असेही काणे यांनी सांगितले.