मुंबई : टॅक्सींच्या मीटर तपासणी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यापुढे टॅक्सीची मीटर टेबल तपासणी संबंधित वाहन नोंदणीकृत असलेल्या प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कार्यक्षेत्रातील अधिकृत केंद्रात करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्य कार्यक्षेत्रातील केंद्राने दिलेले मीटर तपासणी प्रमाणपत्र संबंधित आरटीओकडून स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे टॅक्सी चालकांना मीटर तपासणीसाठी आपल्या नोंदणीकृत आरटीओच्या हद्दीतील केंद्रातच जावे लागणार आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने नुकताच यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्या स्वाक्षरीने हे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकृत मीटर टेबल टेस्टिंग केंद्रांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, संबंधित आरटीओ कार्यालयांनी केवळ आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकृत मीटर तपासणी केंद्रांकडून प्राप्त झालेली प्रमाणपत्रेच स्विकारावीत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अन्य आरटीओच्या कार्यक्षेत्रातील केंद्राकडून चाचणी करून घेतल्यास त्या प्रमाणपत्राला मान्यता मिळणार नाही.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सींच्या सुधारित भाडेरचनेनुसार मीटर रिकॅलिब्रेशन आणि तपासणी प्रक्रियेत एकसमानता राखणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. या निर्णयामुळे मीटर तपासणीच्या प्रक्रियेवर संबंधित आरटीओचे नियंत्रण राहणार असून टॅक्सीचालकांना मात्र तपासणी केंद्र निवडताना कार्यक्षेत्राची मर्यादा पाळावी लागणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मीटर रिकॅलिब्रेशन संस्था नसल्यामुळे व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मिरा-भाईंदर या कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात एकच मीटर रिकॅलिब्रेशन संस्था असल्यामुळे, या कार्यक्षेत्रांतील रिक्षा, टॅक्सी चालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांचे कार्यक्षेत्रातील मीटर रिकॅलिब्रेशन संस्थांमधून मीटर रिकॅलिब्रेशन करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इंधन खर्च, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर, रिक्षा-टॅक्सी यांची देखभाल-दुरूस्तीचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, १ सप्टेंबर रोजीपासून रिक्षाचे एक रुपयाने आणि टॅक्सीची दोन रुपयांनी भाडेवाढ करण्यात आली.
नवीन दरानुसार ऑटो-रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. हे दोन्ही दर पहिल्या १.५ किमीटर अंतरासाठी लागू असतील. सर्व रिक्षा व टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण करण्यासाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ असा ९० दिवसांच्या कालावधीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुदत संपल्यानंतर रिकॅलिब्रेशन न केलेल्या वाहनांवर दररोज दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे.
