Us Women Viral Post on Mumbai Taxi Scam: बाहेरील राज्यातून आलेल्या पर्यटकांची स्थानिक रिक्षा किंवा टॅक्सी चालक फसवणूक करून त्यांच्याकडून जादा पैसे आकारतात. मुंबई बाहेरील शहरांमध्ये असे प्रसंग घडल्याचे आपल्याला ऐकिवात असेल. पण मुंबईतही असेच एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी एका अमेरिकन महिलेला टॅक्सी चालकाने तब्बल १८,००० रुपये आकारले. यानंतर आता या टॅक्सीचालकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकन महिलेने सोशल मीडियावर याबाबत कैफियत मांडल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पीडित महिलेने एक्सवर पोस्ट शेअर करत आपली फसवणूक झाल्याचे म्हटले होते. या पोस्टसह टॅक्सीच्या नंबरचा एक फोटो महिलेने शेअर केला होता. यानंतर सहार पोलिसांनी तातडीने कारवाई करत ५० वर्षीय टॅक्सी चालक आरोपीला अटक केली. देशराज यादव असे टॅक्सी चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना १२ जानेवारी रोजी घडली होती. अर्जेंटिना एरियानो नामक अमेरिकन महिला मुंबई विमानतळावर उतरली होती. विमानतळाहून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी तिने टॅक्सी घेतली. टॅक्सी चालकाने महिलेला थेट हॉटेलमध्ये नेण्याऐवजी अंधेरी (पूर्व) येथे सुमारे २० मिनिटे टॅक्सी फिरवली. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये सोडले आणि भाड्यापोटी १८ हजार रुपये (२०० अमेरिकन डॉलर्स) आकारले.
यावेळी टॅक्सीमध्ये आणखी एक व्यक्ती होता. पोलीस या व्यक्तीच्या भूमिकेबाबतही चौकशी करत आहेत.
अर्जेंटिना एरियानो यांनी २६ जानेवारी रोजी सदर घटनेचा उल्लेख एक्स या सोशल मीडिया साईटवर केला. तसेच तिचा अनुभवही व्हिडीओच्या माध्यमातून मांडला. टॅक्सी चालक आणि त्यात बसलेल्या एका व्यक्तीने तिला अज्ञात ठिकाणी नेले आणि त्यानंतर विमानतळाच्या जवळच असलेल्या हॉटेलमध्ये सोडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले. या पोस्टला आतापर्यंत १ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत.
या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनीही पोस्टची दखल घेतली. पोलिसांनी स्वतःहून २७ जानेवारी रोजी एफआयआर नोंदविला. अर्जेंटिना यांनी शेअर केलेल्या फोटोमधील टॅक्सीच्या नोंदणी क्रमाकांचा शोध घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पोलिसांनी पुढे म्हटले की, सदर महिलेने १२ जानेवारी रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये चेक इन केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेक आऊट केले. त्यानंतर ती पुण्यामार्गे पुन्हा अमेरिकेला परतली. एफआयआर नोंदविल्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी यादवला अटक केली आणि त्याची टॅक्सी जप्त केली. तसेच पोलीस दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. टॅक्सी चालकाचा चालक परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आरटीओला कळविण्यात आले आहे.
झोन आठचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी या कारवाईनंतर सांगितले की, मुंबईत अशी कोणतीही घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ ११२ क्रमांकावर देऊन तक्रार नोंदवावी. पोलीस पुढील कारवाई करतील.

