मुंबई : निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक व आशा सेविकांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यापाठोपाठ त्यांना जनगणनेच्याही कामासाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक व जनगणेनेच्या कामासोबतच शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रमही लावण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्व कामे कशी करायची असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आशा सेविकांसमोरही निवडणुकीचे काम करायचे की जनगणनचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण कसे करायचे

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील २ हजार २७५ शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तसेच ७०० आशा सेविकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे. त्याचवेळी या शिक्षक व आशा सेविकांची जनगणनेसाठीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांना शाळेतील परीक्षेचे वेळापत्रक सांभाळून निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यातच आता जनगणनेच्या कामासाठीही हजर राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. जनगणनेसाठीचे प्रशिक्षण २७ एप्रिल ते ८ मे या कालावधीत होणार आहे.

त्यानंतर प्रत्यक्ष जनगणनेचे काम १६ मे ते १६ जून या कालावधीत होणार आहे. या कालावधीत निवडणूक व जनगणनेची दोन्ही कामे करायची आहेत. तसेच यंदा इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासंदर्भात ४ ते ३० मे या कालावधीत राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच वेळी निवडणूक, जनगणना आणि नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण कार्यक्रम कसे करायचे असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

आराेग्याशी संबंधित योजनांवर परिणाम होण्याची शक्यता

झोपडपट्टी, इमारतीमधील सर्व नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलित करणे, त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या विविध योजना पोहचविण्याची जबाबदारी आशा सेविकांवर असते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनाही निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आले होते. निवडणुकीच्या कामाची जबाबदारी पार पाडत असताना आता त्यांना जनगणनेच्या कामासाठीही हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित योजनांवर होण्याची शक्यता आशा सेविकांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच एकाच वेळी तीन कामे कशी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

कामाच्या ठिकाणापासून अन्यत्र निवडणूक कामासाठी नियुक्ती

आशा सेविका या सरकारच्या स्थायी कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांची निवडणूक व जनगणनेच्या कामासाठी नियुक्ती करणे योग्य नाही. आशा सेविकांची नियुक्ती करताना त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून दूरच्या ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. आशा सेविकांना तुटपुंजे वेतन मिळत असताना त्यांना निवडणुकीच्या कामासाठी अन्यत्र नियुक्त केल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सचिव राजेश सिंह यांनी दिली.