मुंबई : गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला परिमंडळ ६ च्या पथकाने अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी ६.५० कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
गोवंडी शिवाजी नगर परिसरातील कमला रमण नगर परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती परिमंडळ ६ च्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सलमान शेख (२३) याच्या घरी छापा घातला. यावेळी पोलिसांना त्याच्या घरात साडेतीन किलो एमडी, बारा किलो गांजा आणि कोडेन सिरफ असा एकूण ६.५० कोटी रुपये किंमतीचा अमली पदार्थांचा साठा सापडला.
अटक आरोपी हा सराईत तस्कर असून त्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच अमली पदार्थ तस्करीत एक मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.