तापमान ३५.८ अंश से.

वाऱ्यांनी दिशा बदलताच तापमानानेही त्याला लागलीच प्रतिसाद दिला आहे. अवघ्या तीन दिवसांत मुंबईचे तापमान पाच अंश सेल्सिअसने वाढले असून समुद्री वाऱ्यामधील बाष्पामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. ही केवळ उन्हाळ्याची सुरुवात असून कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

डिसेंबरपासून अनुभवलेला गारवा आता भूतकाळात जमा होत असून मुंबईकर उन्हाळ्यात प्रवेश करत आहेत. सोमवारपासून तापमानात दररोज टप्याटप्प्याने वाढ होत असून गुरुवारी सांताक्रूझ येथे ३५.८ अंश से. तर कुलाबा येथे ३३.४ अंश से. तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत तापमानात तातडीने वाढ अपेक्षित नसली तरी मार्चमधील नोंदी पाहता कमाल तापमानात वाढ होणे सामान्य आहे. गेल्या दहा वर्षांपैकी चार वर्षांत मार्चमध्ये ४० अंश से.हून अधिक तापमान नोंदले गेले आहे.