होळीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते या पारंपरिक समजुतीला अनुकूल ठरणारे तापमान बुधवारी नोंदले गेले. मुंबईत २३ मार्च रोजी तब्बल ३८.२ अंश से. कमाल तापमान होते. या ऋतूमधील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. धूलिवंदनाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी तापमानात पाच अंश से.ने घट झाली असली तरी पुढील तीन दिवस तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
मार्चमध्ये येणाऱ्या होळीपासून उन्हाळा सुरू होत असल्याचे म्हटले जाते. या वर्षी हे खरे ठरले असले तरी गेल्या पाच वर्षांत होळीदिवशी नोंद झालेले तापमान व त्या महिन्यातील सर्वाधिक तापमान याचा विचार करता होळी आणि उच्च तापमानाचा फारसा संबंध नसल्याचे दिसते. २०११ आणि २०१४ मध्ये होळीदिवशी तापमान वाढले होते. या दोन्ही वर्षांत मार्चमधील सर्वाधिक तापमानही होळीच्या पुढेमागे दोन दिवसांत नोंदले गेले. मात्र २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये कमाल तापमान ३१ अंश से.पेक्षा कमी होते. त्यातही २०१२ मध्ये होळी लवकर आल्याने थंड वातावरण असल्याचे नोंदीवरून दिसते. या तीनही वर्षांत मार्चमधील कमाल तापमान मात्र ३८ अंश से.वर होते.
तापमान व होळीचा संबंध फारसा दिसून येत नसला तरी या वर्षी मात्र होळीला मुंबईसह राज्यभरात कमाल तापमान चढे होते. मुंबईत सांताक्रूझ येथे ३८.२ अंश से. तापमान नोंदले गेले. भिरा येथे राज्यातील सर्वाधिक, ४४.५ अंश से. तापमान होते. पुणे येथे ३८, नाशिकमध्ये ३८.५, औरंगाबाद येथे ३८, तर नागपूरमध्ये ४० अंश से. तापमान राहिले. पुढील तीन दिवस दक्षिण भारतात उष्णतेची लाट राहणार असून तापमानात फारशी घट होणार नसल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, गुरुवारी सांताक्रूझ येथील कमाल तापमानात पाच अंश से.ची घट झाली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.५ अंश से. होते. पुण्यात मात्र ३९ अंश से. तापमान नोंदले गेले.
कमाल तापमान (अंश से.मध्ये)
वर्ष – होळी दिवशी – मार्चमधील सर्वाधिक
२०१६ – ३८.२ (२३ मार्च)
२०१५ – ३१.३ (५ मार्च)- ४०.८ (२६ मार्च)
२०१४ – ३४.४ (१६ मार्च)- ३८ (१८ मार्च)
२०१३ – ३१ (२६ मार्च)- ४०.५ (८ मार्च)
२०१२ – २७.८ (७ मार्च)- ३९.५ (२५ मार्च)
२०११ – ३६.८ (१८ मार्च)- ४१.३ (१७ मार्च)



