मुंबई : मुंबईमध्ये रक्ताचा साठा पुरेसा असतानाही थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्तासाठी वणवण भटकावे लागत आहे. ए, बी, ओ आणि एबी यांसारख्या सर्वसामान्य रक्तगटांचे रक्त सहज उपलब्ध होत असतानाही शहरातील खासगी तसेच सार्वजनिक रक्तपेढ्यांकडून थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्त देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नियमित रक्तसंक्रमणाची गरज असलेल्या थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्तविकार असून या रुग्णांच्या शरीरामध्ये नवे रक्त तयार होत नसल्याने रुग्णांना दर १५ ते ३० दिवसांनी नियमित रक्तसंक्रमण करावे लागते. या रुग्णांना रक्त मिळण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी रक्तपेढ्यांनी या रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले आहेत. सरकारच्या नियमांनुसार मोफत रक्त मिळण्याचा अधिकार रुग्णांना असला, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. थॅलेसेमियाच्या रुग्णांना होणारा हा त्रास लक्षात घेता राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या निर्देशानुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेने या रुग्णांसाठी ‘दैनंदिन काळजी केंद्र’ सुरू केले. या केंद्रांना मोफत रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी काही रक्तपेढ्यांवर सोपवली. यामध्ये सरकारी व खासगी रक्तपेढ्यांचा समावेश आहे. मात्र काही रक्तपेढ्या या ‘दैनंदिन काळजी केंद्रां’ना रक्त पुरवठा करत नाहीत. त्यामुळे रक्तसाठा उपलब्ध असूनही अनेकांना विविध रक्तपेढ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

थॅलेसेमियाच्या रुग्णांना एकदा मोफत रक्तपुरवठा केल्यास मोठ्या प्रमाणावर रुग्ण रक्तासाठी येतील. परिणामी रक्तसाठ्याच्या पुरवठ्यावर ताण निर्माण होईल, अशी भीती रक्तपेढ्या व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुंबईतील बहुतांश खासगी व सरकारी रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा असतानाही मोफत रक्तपुरवठा करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे थॅलेसेमिया रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, थॅलेसेमियाच्या रुग्णांना काेणत्याही परिस्थितीत रक्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना रक्तपेढ्यांना दिल्या आहेत. मात्र अनेक रक्तपेढ्या या रक्तपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. या रक्तपेढ्यांना वारंवार सूचना देऊनही त्याकडे त्या दुर्लक्ष करत असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. थॅलेसेमिया रुग्णांना आयुष्यभर नियमित रक्ताची आवश्यकता असते. वेळेवर रक्तसंक्रमण न झाल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रक्ताची उपलब्धता आणि त्याचा पात्र रुग्णांना विनाविलंब पुरवठा होणे ही आरोग्य व्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.