मुंबई : मुंबईसह उत्तर कोकणवासियांनी नुकताच तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. या दरम्यान कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदली गेली. मात्र, मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड आदी भागांना पुन्हा दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इराशा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना पुन्हा उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर प्रतिचक्रवात स्थिती निर्माण झाल्याने प्रामुख्याने उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि पालघरमधील उष्णतेत लक्षणीय वाढ झाली होती. गुजरात राज्यातील काही भागात तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. मुंबईत या हंगामातील आणि मागच्या काही वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद (४० अंश सेल्सिअस ) मंगळवारी झाली होती. त्यानंतर मागील दोन दिवसात उत्तर कोकणातील काही भागातील कमाल तापमानात काहीशी घट झाली होती. तर काही ठिकाणी सामान्यापेक्षा अधिक तापमानची नोंद होत होती.
मुंबई आणि उपनगरातील कमाल तापमानात मागील दोन दिवस घट झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. दोन दिवसांपासून पारा ३५ अंशाच्या खाली नोंदला जात आहे. गुरुवारी हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रात ३३.१ अंश सेल्सिअसची तर कुलाबा केंद्रात ३२.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. यामुळे बुधवारपासून मुंबईच्या कमाल तापमानात घट नोंदली जात आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबई शहरातील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके राहील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुरुवारी डहाणू येथे ३४.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.
उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा कुठे?
शुक्रवारी आणि शनिवारी उत्तर कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड आदी भागातील काही ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवसात कोकणातील कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आदी प्रदेशातील काही भागांना शनिवार १४ मार्चपासून पुढील तीन दिवस तर विदर्भात शुक्रवारपासून पुढील तीन दिवस मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभाकडून व्यक्त केला आहे.
