मुंबई : मागील काही दिवसांपासून महामुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून गुरुवारपासून अनेक भागात पावसाची तीव्रता वाढली आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईसह ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून शनिवारी सकाळीही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून शनिवारी आणि रविवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

जून महिन्यात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून घाट प्रदेश आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक असून काही भागात ४०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मुंबईमहानगर प्रदेशातील अनेक भागात शुक्रवारी रात्रीपासून धुवाँधार पाऊस पडत असून शनिवारीही सकाळीही पावसाचा जोर कायम आहे. यात पालघर जिल्ह्यातील वसई-विरार, ठाणे, कल्याण, मीरा रोड, तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून काही भागात दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पावसाचा जोर अधिक कुठे ?

राज्याच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीवर ऑफ-शोअर ट्रफ म्हणजेच कमी दाबाचा लांब पट्टा तयार झाला असून तो संपूर्ण आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील दोन दिवसात ते आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ४ ते ७ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरड कोसळण्याची शक्यता कुठे ?

मुंबई महानगर क्षेत्रातील विक्रोळी, कळवा, अँटॉप हिल, घाटकोपर पश्चिम , कल्याण पूर्व, नालासोपारा,विरार, गिल्बर्ट हिल, चेंबूर आणि पांजरपोळ आदी भागातील दरडप्रवण क्षेत्रात दरड कोसळण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यांउळे डोंगर उतारावर आणि पायथ्याशी राहत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान अभ्यासकांनी केले आहे.