मुंबई : मुंबईसह संपूर्ण कोकण प्रदेशातील कमाल तापमानात मागील दोन दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. मुंबईत मागील दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ३७ अशांवर स्थिर आहे तर पालघर, ठाणे येथेही सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, आजही संपूर्ण उत्तर कोकण प्रदेशाला उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’
देण्यात आला असून या दरम्यान कमाल तापमान ३५ ते ३७ अशांवर राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मुंबईसह पालघर, ठाणे आणि बहुतांश प्रदेशातून शनिवार मान्सूनने माघार घेतली. यंदा मान्सून सरासरी वेळेतून दोन दिवस आधीच माघारी गेला. पुढील दोन ते तीन दिवसात उर्वरित राज्यातून मान्सून माघारी जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात पावसाळी हवामान असल्याने उन्हाची तीव्रता कमी होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. यंदा प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती असल्याने पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत या स्थितीचा प्रभाव राहील, अशी शक्यता जगभरचे हवामान अभ्यास व्यक्त करत आहे.
पूर्वेकडून येणाऱ्या कोरड्या हवेच्या प्रभावामुळे उष्णेत वाढ झाली आहे असे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, सोमवारी ठाणे जिल्ह्याला उष्णेचा अर्लट देण्यात आला असून कोकण प्रदेशातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही हीच स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या डहाणू केंद्रात शनिवारी ३७.९ अंश सेल्सिअलस कमाल तापमानाची नोंद झाली जे सरासरी कमाल तापमानहून ५.२ अंशांनी अधिक होते. तसेच ठाणे ३६.६ अंश सेल्सिअलस, कुलाबा ३६.५ तर सांताक्रूझ येथे ३७.४ अंश सेल्सिअलस कमाल तापमानाची नोंद झाली जे सरासरी कमाल तापमानाहून ५ अंशांनी अधिक होते. आजही मुंबईत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअलस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उष्ण आणि दमट वातावरणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम
या वातावरणाचा थेट परिणाम शरीरावर होतो. उष्माघात, डोकेदुखी, त्वचेच्या समस्या, थकवा आणि पाण्याच्या कमतरतेचे त्रास वाढतात. तापमान खूप वाढल्यास शरीराचं तापमान नियंत्रित न राहता अचानक चक्कर, उलट्यांचा त्रास. जास्त घाम येतो, पण भरपूर पाणी न प्याल्यास शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे थकवा जाणवतो. दमट हवेमुळे त्वचेला पुरेशी हवा लागत नाही, परिणामी घामोळे, फंगल इंफेक्शन, खाज येणे, लालसरपणा दिसू शकतो.
