मुंबई : मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन हवामान विभगाकडून देण्यात येणाऱ्या इशाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून बुधवारी पालघर जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे, तर मुंबई, रायगड आणि ठाण्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे या प्रदेशात पावसाचा जोर काहीसा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकण प्रदेशात पावसाचा जोर मागील आठवड्यापासून कायम आहे. त्यामुळे काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झाली असून काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी दाबाची प्रणाली तसेच दक्षिण गुजरातपासूनउत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत ‘ऑफ शोअर ट्रफ’ म्हणजे कमी दाबाचा लांब पट्टा पसरला आहे.

या काही हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने पावसाच्या तीव्रतेतही वाढ झाली होती. दरम्यान, बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, या प्रदेशातील काही भागात बुधवारी सकळापासूनच पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून इशाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून या पालघर जिल्ह्यात बुधवारीही अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून काही भागात पावसाची संततधार सुरू असून काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर कायम आहे, दरम्यान, वांद्रे, दादर, सांताक्रूझ, विलेपार्ले तसेच शीव आणि शहर आणि उपनगरातील बहुतांश भागात बुधवारी सकाळपासून पावसाची नोंद होत आहे.तर काही भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, सकाळच्या सुमारास किंग सर्कल परिसरात एक मोठा वृक्ष उन्मळून पडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

कुठे किती पाऊस ?

(बुधवार सकाळी ८:३० ते गुरुवार सकाळी ८:३०)

कुलाबा – ६२.१ मिमी

सांताक्रूझ – १२५ मिमी

ठाणे – ११२ मिमी

बेलापूर – १२१ मिमी

नेरुळ – ११३ मिमी

वाशी – ९९ मिमी

कोपरखैरणे – १११ मिमी

ऐरोली – १०१ मिमी

दिघा – मिमी