मुंबई : उत्तर कोकणात मान्सून पूर्व घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून या भागातील नागरिकांना तीव्र उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या प्रदेशातील काही भागात मागील दोन दिवसांपूर्वी उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती नोंदली गेली होती तसेच उष्ण आणि दमट वातावरण कायम होते. मात्र, हवामानात बदल होण्याचा अंदाज असून पालघर आणि ठाणे जिल्ह्यात सोमवारी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहतील असाही अंदाज आहे.
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि पालघर येथील उकाड्यात वाढ झाली असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. तसेच या प्रदेशातील अंतर्गत भागात उष्मा अधिक आहे. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी डोंबिवली आणि कल्याण येथे वादळी वाऱ्यांची आणि धुळीच्या वादळासह काही भागात पावसाची नोंदही झाली होती. तसेच पालघर जिल्ह्यातील वसई -विरार आणिकाही भागात तसेच मीरा -भाईंदर येथील काही भागात चार दिवसांपूर्वी हलक्या सरींची नोंद झाली होती. तर मुंबईतील मुलुंड आणि वांद्रे येथे हलक्या सरीं बरसल्या होत्या. आता पुन्हा या प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या या प्रदेशात हवामान कोरडे असून मुंबईसह काही भागात उकाड्यात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंदात शुक्रवारी ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. जे सरासरी कमाल तापमानाहून १.६ अंशांनी अधिक होते. तसेच सांताक्रूझ येथे ३५.२ अंश सेल्सिअस कमाल होते.तर डहाणू येथे ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. येथे सरासरी कमाल तापमानाहून २.२ अंश अधिक तापमान होते. तर या प्रदेशात रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली आहे. मात्र, रविवार पासून उत्तर कोकण प्रदेशातील काही भागात मान्सूनपूर्व घडामोडींना वेग येण्याचा अंदाज आहे.
वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ कुठे ?
रविवारी मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर सोमवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांना सोमवारी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून सोमवारी नागरिकांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळेल, असा अंदाज आहे. तर मुंबईत हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
