मुंबई : मागील काही दिवसांपासून कोकण पट्ट्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण कायम असून मुंबई महानगर प्रदेशातील उकाड्यातही वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशात शनिवारीही नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. तसेच मुंबईसह पालघर आणि ठाण्यात रविवारीही उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात सध्या वादळी पावसाची नोंद होत आहे. तसेच कोकण प्रदेशातील रायगड आणि वेळास येथेही वादळी पावसाची नोंद झाली. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी धुळीच्या वादळासह काही ठिकाणी पावसाची नोंद झाली होती. नागरिकांना पावसाचे वेध लागले असले तरीही मे महिन्यात उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील उन्हाची काहिली वाढत आहे. उष्ण आणि दमट वातावरणामुळे आर्द्रतेही वाढ झाली असून सकाळी आणि संध्याकाळी घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. या प्रदेशातील अंतर्गत भागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. तसेच किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली आहे. यामुळे मे महिना मुंबई महानगर प्रदेशासाठी तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रात ३५.६ अंश सेल्सियस, तर कुलाबा केंद्रात ३४.४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात शुक्रवारीही तापमानाचा पारा ३५ अंशावर नोंदला गेला होता. तर शहरात कुलाबा केंद्रात २७. ६ आणि सांताक्रूझ केंद्रात २८. २ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, शहरात रविवारी ३६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २८ अंश सेल्सियस असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच उत्तर कोकण प्रदेशात रविवारी अंशत: ढगाळ वातावरण असेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात पुढील दोन दिवसात १ ते २ अशांनी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना पुढील काही दिवसात तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
कुठे तापमान किती ?
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे ३६. ३ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. ठाणे बेलापूर येथे ३८.३ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदले गेले. राम मंदिर ३९, विक्रोळी ३८. ८, टाटा पॉवर चेंबूर ३६. ६, विद्याविहार ३५. ७, दहिसर ३५. ७, तर वांद्रे ३५. ४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.
