Mumbai-Thane MMR Political Scenario : मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआर या पट्ट्यातील आठ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटातच खरी चुरस आहे. मुंबई महानगरावर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. नियोजनाचा बट्ट्याबोळ, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव यातून महानगरांमधील मतदार निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष प्रकट करतात का, याची उत्सुकता आहे.
मुंबई महानगर क्षेत्रविकास क्षेत्राचा विचार केल्यास मुंबई महानगरपालिकेबरोबरच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर या आठ महानगरपालिकांचा समावेश होतो. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा महानगरपालिका आहेत. पालघरमधील वसई-विरार या महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. मुंबई महानगरावर पारंपारिकपणे एकत्रित शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. मुंबईत तर शिवसेनेची गेली ४० वर्षे सत्ता आहे. ठाणे आणि शिवसेना हे जणू काही समीकरणच आहे.
नवी मुंबईत गणेश नाईक हा हुकूमाचा एक्का असल्याने नाईकांचा पक्ष सत्तेत असतो. कल्याण-डोंबिवली हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. पण गेल्या काही वर्षांत शिवसेनेने तेथे वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामी भाजपची पिछेहाट झाली. वसई-विरारमध्ये गेली काही वर्षे हितेंद्र ठाकूर यांचे एकतर्फी वर्चस्व राहिले आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपने बस्तान बसविले. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीच्या वर्चस्वाला सुरुंग लागल्यापासून शिवसेनेने तेथे बऱ्यापैकी बस्तान बसविले. भिवंडी-निजामपूरमध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टीची ताकद असली तरी पालिकेतील सत्तेची गणिते वेगळीच आहेत.
आता चित्र कसे असेल?
ठाणे आणि शिवसेना हे समीकरणच तयार झाले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पक्षाला राज्यात पहिले नगराध्यक्षपद हे ठाण्यात मिळाले. १९७० च्या दशकापासून ठाण्यात शिवसेनेने स्वतःची ताकद निर्माण केली. १९७४ मध्ये सतीश प्रधान थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आले. तेव्हा ठाण्याचा मोठा कायापालट झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यात बारीक लक्ष असे. गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम, चांगले रस्ते, सुशोभीकरण हे शिवसेनेच्या सत्तेच्या काळात झाले.
१९९२ च्या महानगरपालिका निवडणुकीचा अपवाद वगळता ठाण्यात कायम शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. आनंद दिघे यांचा ठाण्यावर वचक होता. त्यांच्या पश्चात एकनाथ शिंदे यांनी जम बसविला. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाण्यातील शिवसेना ही शिंदे यांच्या पाठीशी उभी राहिली. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली. यंदा ठाण्यात शिंदे यांच्यासमोर भाजपने आव्हान उभे केले आहे.
शिंदे यांची ठाण्यातील सद्दी संपविण्याची भाजपची योजना आहे. पण शिंदे यांची ठाण्यात पाळेमुळे घट्ट असल्याने भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली तरी जुने ठाणे वगळता अन्यत्र शिंदे यांचेच वर्चस्व राहील, अशी शक्यता आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा बालेकिल्ल्यात शिंदे गट किती हादरा देतो, यावर सारे अवलंबून आहे. ठाण्यात शिंदे यांचाच दबदबा राहील, असे चित्र आहे.
कल्याण डोंबिवलीत सत्ताधाऱ्यांतच संघर्ष
कल्याण-डोंबिवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काहीही करून कल्याण-डोंबिवलीत सत्ता मिळवायचीच, असा निर्धार भाजपने केला आहे. त्यातूनच शिंदे यांच्या पक्षातील नगरसेवकांना भाजपने गळाला लावले. त्यावरून प्रकरण चांगलेच तापले. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदे गटाची बहिष्कारापर्यंत मजल गेली. शेवटी कल्याण-डोंबिवलीतील वाद नवी दिल्लीत अमित शहा यांच्यापर्यंत गेला. शहा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना बोलावून ताणून धरू नये, असे बजावले. कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटाची युती होण्याची शक्यता कमीच आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी वा मनसेची ताकद घटली आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना शिंदे गटातच लढत होण्याची चिन्हे आहेत.
नाईक म्हणतील ती पूर्व दिशा की…?
नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या हाती सारी सत्ता असते. नाईक शिवसेनेत होते तेव्हा महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. नाईक राष्ट्रवादीत गेल्यावर राष्ट्रवादीची सत्ता आली. सध्या नाईक भाजपमध्ये आहेत. नाईकांचा क्रमांक एकचा शत्रू हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा आहे. यामुळे काहीही करून नवी मुंबई महानगरपालिकेची सूत्रे हाती घेऊन शिंदे यांच्यावर मात करण्याची नाईकांची योजना आहे. महायुतीतून एकत्र लढण्याचा वरून निरोप आला तरीही गणेश नाईक बधणार नाहीत, अशी शक्यता आहे. नवी मुंबईत गणेश नाईक ठरवतील तसेच होईल, असे एकूण चित्र आहे.
ठाकुरांच्या अस्तित्वाचा प्रश्न
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची गेली अनेक वर्षे सत्ता होती. वसई म्हणजे ठाकूर हे समीकरण. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज हे दोघेही पराभूत झाले. भाजपच्या स्नेहा दुबे आणि राजेंद्र क्षीरसागर यांनी ठाकूर यांच्या वर्चस्वाला हादरा दिला. ठाकूर यांची सद्दी संपविण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. नालासोपारा व अन्य भागांत वाढलेल्या उत्तर भारतीय मतदारांवर भाजपची मदार आहे. हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. विधानसभेपाठोपाठ महानगरपालिका भाजपने हिसकावून घेतल्यास ठाकूर यांच्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल.
भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा
मीरा-भाईंदरमध्ये गेल्या १५ वर्षांत भाजपने ताकद वाढवली. गुजराती, मारवाडी, जैन मतदारांच्या वाढत्या संख्येमुळे भाजपला फायदा झाला. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. शेजारील मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) प्रताप सरनाईक हे आमदार आहेत. सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. मीरा-भाईंदरमध्ये महायुती एकत्र लढणे कठीणच मानले जाते. या महानगरपालिकेत मराठी विरुद्ध अमराठी वादाला फोडणी देण्याचा प्रयत्न होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना ठाकरे, मनसे त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करतील. मीरा रोड या प्रभाव क्षेत्रात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा काँग्रेस नेते मुझ्झफर हुसेन यांचा प्रयत्न असेल.
उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजप आणि शिंदे गटात लढत आहे. माजी नगरसेवक फोडण्यावरून भाजप आणि शिंदे यांच्यात सुरुवात उल्हासनगरातूनच झाली. भिवंडीमध्ये मुस्लिमबहुल प्रभागांत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, समाजवादी पार्टीत लढत अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे यांनीही भिवंडीवर जोर दिला आहे.
नागरी सुविधांचा अभाव
मुंबई महानगर पट्ट्यातील सर्व शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा मुख्य प्रश्न भेडसावत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने हे संकट उभे राहिल्याचा दावा केला जात असला तरी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही शहरात गेल्यास रस्ते खोदलेले आहेत. घोडबंदर मार्गावर तर प्रवास नको अशी अवस्था निर्माण झाली आहे. या शहरांच्या बट्ट्याबोळाचा फटका भाजप व शिंदे गटाला बसू शकतो.
