मुंबई : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरला ७५ वर्षे जुनी ”कळवा – कल्याण” पारेषण वाहिनी ११० केव्हीवरून २२० केव्हीपर्यंत अद्ययावत करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या प्रकल्पात खारफुटीची कत्तल किंवा विनाश होणार नसल्याचे न्यायालयाने परवानगी देताना स्पष्ट केले.
सध्याची पारेषण पायाभूत सुविधा बदलणे हा या अद्ययावतीकरणाचा एक अविभाज्य आणि आवश्यक भाग आहे, असेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्णय देताना प्रामुख्याने नमूद केले. न्यायालयाने टाटा पॉवरची पारेषण टॉवर्स बदलण्याची मागणी केली. त्यात खारफुटीच्या संरक्षित क्षेत्रापासून (बफर झोन) ५० मीटरच्या आत असलेल्या दोन टॉवर्सचाही समावेश आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये विद्यमान ८७ पारेषण टॉवर्सच्या जागी ”मल्टी-सर्किट २२० केव्ही टॉवर्स” बसवण्याचा समावेश असून नवीन टॉवर्स हे सध्याचे टॉवर्स असलेल्या जागेवरच बांधले जातील. तसेच, त्यासाठी कोणतीही खारफुटीची झाडे तोडली जाणार नाहीत, असे कंपनीने परवानगी मागताना न्यायालयाला सांगितले होते.
सुमारे ४८८ कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी ४.५७७३ हेक्टर वनजमिनीचा वापर करणे आवश्यक आहे. कंपनीने यासाठी आवश्यक कायदेशीर मंजुरी मिळवली आहे. त्यात वन विभागाची मंजुरी, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची (एमईआरसी) मंजुरी, महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची (एमसीझेडएमए) शिफारस आणि किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) मंजुरी यांचा समावेश आहे. याशिवाय, याची आणि कोणत्याही प्राधिकरणाने या प्रकल्पाला विरोध केलेला नाही व सक्षम प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या देण्यात आल्या आहेत, असे न्यायालयाने कंपनीची मागणी मान्य करताना नमूद केले.
टाटा पॉवरने अनुपालन प्रतिज्ञापत्र देखील सादर केले. त्यानुसार, प्रकल्पाचा एकूण खर्च (एनपीव्ही) आणि ”भरपाई वृक्षारोपण” यासाठी वन विभागाकडे २.०४ कोटी रुपये भरल्याचे सांगितले. याशिवाय, वापर बदल करण्यात आलेल्या ४.५७७३ हेक्टर वनजमिनीपैकी, ठाणे वन विभागांतर्गत ३.८५०३ हेक्टर क्षेत्रातील ८२ झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. तथापि, मुंबई खारफुटी संवर्धन युनिटच्या ०.७२७ हेक्टर क्षेत्रात कोणतीही खारफुटीची झाडे तोडण्याचा प्रस्ताव नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. कंपनीने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ९.२० हेक्टर खराब झालेल्या वनजमिनीवर भरपाई वृक्षारोपणासाठी आणखी ८२.७० लाख रुपये भरले आहेत. मंजूर योजनेअंतर्गत १०,२२१ रोपे लावली जातील, असेही न्यायालयाने म्हटले होते.
प्रकल्पाला सशर्त मंजुरी
खारफुटीच्या संरक्षणाबाबत २०१८ मध्ये दिलेल्या आदेशांनुसार, न्यायालयाने कंपनीला प्रकल्पासाठी सशर्त परवानगी दिली. त्यानुसार, कंपनीला पुढील १० वर्षांसाठी दरवर्षी दोनदा वृक्षारोपण, देखभाल, संरक्षण आणि वनीकरण याबाबतचे सविस्तर स्थितीदर्शक व लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या शपथपत्रांसह हे अहवाल दरवर्षी १२ जानेवारी आणि १२ जुलैपर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. हे अहवाल किंवा अर्ज सादर करण्यात कसूर केल्यास ती न्यायालयाची अवमानना मानली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट करून ”टाटा पॉवर”ची याचिका मंजूर केली.
