मुंबई : मागील काही दिवसांपासून उत्तर कोकणातील अनेक भागात वादळी पावसाची नोंद होत असून शनिवारपासून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यातही सोमवारीही काही भागात वादळी पावसाची नोंद झाली. दरम्यान, उत्तर कोकण प्रदेशात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून हवामान विभागाकडून मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना मंगळवारी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला, तर पालघर जिल्ह्यातही वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जुलै महिन्याच्या सुरुवातीला काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झाली होती. त्यांनतर मात्र, पावसाने उत्तर कोकणासह राज्यभर विश्रांती घेतल्याने उत्तर कोकण प्रदेशातील कमाल तापमानात काहीशी वाढ झाली होती. तसेच रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. उत्तर कोकणातील अनेक भागात हलक्या ते मध्यम सरींची, तर काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. तसेच अनेक भागात धरणक्षेत्रातही चांगल्या पावसाची नोंद होत असून या प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जुलैच्या सरासरी पावसाहून अधिक पावसाची नोंद यापूर्वीच झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने उत्तर कोकण प्रदेशातील शेतीच्या कामांना वेग प्राप्त झाला आहे. दरम्यान, मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस या प्रदेशात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळपासून मुंबईत पावसाची नोंद होत असून दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक आहे. शहरात आणि उपनगरात मंगळवारी दिवसभर आकाश ढगाळ राहील. तसेच मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या दरम्यान, प्रतितास ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाऱ्यांसह अधूनमधून अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासात मुंबईच्या पूर्व उपनगरात ४५.१ मिमी , मुंबई शहरात ३६.६७ मिमी, तर पश्चिम उपनगरात २८.४० मिमी पावसाची नोंद झाली. तसेच मंगळवारी समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता असून मंगळवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास ३.६४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास ३.२७ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.