मुंबई : सिमेंट आणि काँक्रिटीकरणामुळे वृक्ष कोसळण्याचे धोके, याचिकाकर्त्यांच्या शिफारशी आणि एकूण या समस्येवर एकत्रितपणे बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी याचिकाकर्ते, या विषयांतील तज्ज्ञांच्या समिती आणि मुंबई -ठाणे महापालिकेला दिले. सिमेंट आणि काँक्रिटीकरणामुळे वृक्षांचे आयुर्मान कमी होऊन ते कोसळतात, असा दावा करून ठाणेस्थित पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत, तर मुंबईस्थित वकील सागर उगले यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.
त्यावेळी, झाडे, वृ्क्षांच्या मुळांची जमिनीखाली वाढ योग्यरित्या होण्यासाठी त्यांच्या सभोवताली ठाराविक भाग मोकळा ठेवणे आवश्यक आहे. मात्र, तशी व्यवस्था झाडांभोवती नसल्यामुळे झाडे कोसळत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने भट्टाचार्य यांनी केला. तथापि, मुंबईत अनेक ठिकाणी निमुळते, अरुंद रस्ते आहेत. त्यामुळे, प्रत्येक झाडाभोवती अशा प्रकारे जागा मोकळी ठेवणे शक्य नाही. असे मुंबई महापालिकेच्यावतीने वकील माधवी तवानंदी न्यायालयाने यांनी न्यायालयाला सांगितले.
त्यावर, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही तज्ज्ञांचा सल्ला घेतला असल्याचे याचिकाकर्त्यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तर, याचिकाकर्त्यांनी याआधी सुचवलेल्या शिफारसींबाबत आम्ही सकारात्मक असून त्याची अमंलबजावणी कऱण्यास तयार असल्याची माहिती मुंबई आणि ठाणे महापालिकेतर्फे न्यायालयाला देण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकाकर्ते. तज्ज्ञांच्या समितीसह मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घ्यावी, त्यात या समस्येवर चर्चा करावी आणि तोडगा काढावा, असे आदेश न्यायालयाने दिले. सध्या अधिकारी गणेशोत्सवाच्या कामात व्यग्र आहे, त्यामुळे गणेशोत्सवानंतर बैठक घेण्याचे आदेश देऊन न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली.
