मुंबई : पालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात चालढकल केल्याप्रकरणी मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर आता शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. येत्या दोन महिन्यांत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम पूर्ण केले जाईल असे हमीपत्र पालिकेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे पाठवले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी आता युद्धपातळीवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची शिक्षण विभागाची लगबग सुरू आहे.

पालिका शाळेत सीसीटीव्ही लावण्याच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याबाबत पालकमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांचे निलंबन गेल्या आठवड्यात केले होते. पत्रकार परिषदेत केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली होती. बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे निलंबन करण्यात आले होते. निलंबन मागे घ्यावे यासाठी स्वत: अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी हे पत्रकार परिषदेतच पालकमंत्र्यांची विनवणी करीत होते. सीसीटीव्ही लावण्याची हमी देऊ असेही आश्वासन सैनी यांनी दिले होते. मात्र पालकमंत्र्यांनी निलंबन मागे घेतले नाही व शिक्षण विभागाला निलंबनाचे पत्रक काढण्याचे आदेश दिले. दरम्यान, पालिकेच्या शिक्षण विभागात सोमवारी याविषयावरून दिवसभर खल सुरू होता. दोन महिन्यांत शहर भागातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील अशा आश्वासनाचे पत्र शिक्षण विभागाने पालकमंत्र्यांना पाठवले असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसात कंकाळ यांच्या निलंबनाबाबत काही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – मुंबई – अयोध्या विशेष रेल्वेगाडी

हेही वाचा – सीएसएमटीवरून २४ डब्यांची गाडी धावणार, फलाटांचे विस्तारीकरण अंतिम टप्प्यांत

मुंबई महानगरपालिकेच्या १२३ शाळांमध्ये पुढील दोन महिन्यांत तब्बल २८०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी आधीच निविदा प्रक्रिया सुरू होती. हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सुमारे १८ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे.