मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदानातील लाल माती काढण्याचा मुद्दा उन्हामुळे आणि लोकसभेच्या निवडणुकीमुळे चांगलाच तापला आहे. मैदानातील वरवरची माती काढण्याचे काम पालिकेने सुरू केले असले तरी ते संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांमध्ये संताप आहे.

निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यावरून रहिवासी आक्रमक झाले असून ‘ते मत मागायला येतील, तुम्ही माती काढायला सांगा’, असे आवाहन शिवाजी पार्क संघटनेने समाजमाध्यमांवरून केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. मैदानातील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी हिरव्या गवताची लागवड केली होती. तसेच पर्जन्य जलसंचय यंत्रणा, तुषार सिंचन असेही अनेक प्रयोगही करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर तसेच राजकीय हस्तक्षेपानंतर हे सगळे प्रयोग अर्धवट राहिले. हिरवळ निर्माण करण्यासाठी या मैदानावर मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आली होती. पण हिरवळीचा प्रयोग फसल्यानंतर उरलेली माती वाऱ्याबरोबर उडते. त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात धुळीचा त्रास वाढतो. आताही धुळीचा त्रास अधिकच वाढला असून मैदानातील माती काढून टाकावी, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.

हेही वाचा – दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा

माती काढण्यावर मर्यादा!

याबाबत पालिकेच्या जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी म्हणाले की, स्वच्छतेसाठीच्या यंत्राचा वापर रात्री मैदानातील माती काढण्यासाठी केला जात आहे. तसेच सकाळी १० वाजेपर्यंत शिवाजी पार्कमध्ये नागरिक येतात. तर उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे क्रिकेटचे सामने दिवसभर सुरू असतात. त्यामुळे या कामावर मर्यादा येत आहेत.

माती काढण्याचे काम संथगतीने

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस पाठवून मैदानातून १५ दिवसांत माती काढण्याचे निर्देश दिले. मात्र प्रत्यक्षात १३ एप्रिलपासून माती काढण्याचे काम सुरू असून दिवसाला केवळ एक ट्रक माती काढली जात आहे. या गतीने माती काढल्यास दोन-तीन महिने लागतील. ते आम्हाला मान्य नाही, असे शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचे पदाधिकारी सुहास पटवर्धन यांनी सांगितले.

हेही वाचा – भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर

मैदानातून उडणाऱ्या धुळीच्या त्रासामुळे रहिवासी, तसेच व्यायाम करण्यास, फेरफटका मारण्यास येणाऱ्यांना श्वसनाचे आणि त्वचेचे आजार होत आहेत. त्यामुळे ही माती काढणे आवश्यक आहे. – प्रकाश बेलवडे, शिवाजी पार्क रहिवासी संघटना