मुंबईः सासरच्या व्यक्तींना मेहुणीची अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्रे पाठवून कौटुंबिक हिंसेचा गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावणाऱ्या एका व्यक्तीविरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आरोपीच्या धाकट्या भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीला बेशुद्ध करून तिची अर्धनग्न अवस्थेत छायाचित्रे काढण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. २२ वर्षीय पीडित तरुणीच्या मोठ्या बहिणीचे २०२१ मध्ये कौसा-मुंब्रा येथील व्यक्तीशी लग्न झाले होते. तक्रारदार महिला नेहमीच तिच्या बहिणीच्या सासरी जात होती. त्यावेळी बहिणीच्या २२ वर्षीय दिराशी परिचय झाला. पोलीस तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडित तरुणी बहिणीच्या सासरी गेली होती. त्या दिवशी घरात पीडित तरुणी, बहिणीचा दिर आणि त्यांची आजी असे तिघेच होते. पीडित तरुणीचे डोक दुखत असल्यामुळे तिला बहिणीच्या दिराने एक गोळी दिली. ती घेतल्यानंतर पीडित तरुणी झोपली. त्याचा फायदा घेऊन दीराने पीडित तरुणीचे अर्धनग्न छायाचित्र काढले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पण ती झोपेत असल्यामुळे तिला याची कोणतीही कल्पना नव्हती. हेही वाचा - मुंबई : रस्ते कामांसाठीच्या खर्चात मोठी वाढ, साडेआठ हजार कोटींवर खर्च; लवकरच कंत्राटदारांना कार्यादेश पीडित तरुणीचे बहिणीच्या दिरासोबत लग्न करण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यामुळे दोघेही नियमितपणे मेसेंजरवर चॅट करत होते. एका दिवशी बहिणीच्या दिराने तिला छायाचित्रे पाठवण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर त्याने तिला आपल्याकडे तिची अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्रे असल्याचे सांगितले. ते ऐकल्यावर पीडित तरुणीला धक्का बसला. हेही वाचा - पीएनबी बँक घोटाळा : मेहुल चोक्सीचे पारपत्र निलंबितच राहणार, संबंधित कागदपत्रे मिळण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली जुलै महिन्यात महिलेच्या मोठ्या बहिणीने हुंडा न आणल्याबद्दल क्रूरता आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती आणि दिरासह अन्य काही जणांविरोधात तक्रार केली होती. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर, २२ वर्षीय आरोपीने पीडित तरुणीचे अर्धनग्न छायाचित्र मोठा भाऊ आणि एका मित्राला पाठवले. त्याच्या मोठ्या भावाने नंतर तक्रारदाराच्या सौदी-अरेबियातील भावाला ही छायाचित्रे पाठवली आणि त्याच्या मोठ्या बहिणीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हा मागे घ्यावा अन्यथा तो तिच्या लहान बहिणीची अर्धनग्न छायाचित्रे सर्वत्र प्रसारित करेल, असे धमकावले. यानंतर पीडित तरुणीने तिच्या बहिणीचा पती, त्याचा धाकटा भाऊ आणि धाकट्या भावाच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७७, ७५ (२), ३५१ (२), ३ (५), १२३ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.