अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमीष दाखवून कर्ज वसुलीसाठी धमकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. जोगेश्‍वरीतील एका वकिलाचे अश्लील छायाचित्र प्रसारीत करून त्याला धमकावण्याची घटना घडली. या वकिलाच्या तक्रारीवरुन याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर पोलीस करत आहेत.

जोगेश्‍वरीतील बेहरामबाग परिसरात तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून ते व्यवसायाने वकील आहे. गेल्या आठवड्यात त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी एका अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांना ६ हजार ८२५ रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली. मुद्दलासह साडेतीन हजार रुपयांचे व्याज सात दिवसांत द्यायचे होते. मात्र सात दिवस होण्यापूर्वीच त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून शिवीगाळ करुन धमकी दिली जात होती. तातडीने कर्जाची परतफेड न केल्यास अश्‍लील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी देण्यात आली. त्यावरून कर्जदार वकील आणि फोन करणाऱ्या व्यक्तीमध्ये वाद झाला.

त्यांनी धमकी देण्यात येणारा दूरध्वनी क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर त्यांच्या बहिणीला एका अनोळखी मोबाइलरुन तक्रारदार वकिलाचे अश्लील छायाचित्र पाठवण्यात आले. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीने ते तयार केले होते. तिने हा प्रकार तिच्या भावाला सांगितला. छायाचित्र पाठवलेल्या क्रमांकावर दूरध्वनी करुन विचारणा केली असता त्याने कर्जाची परतफेड न केल्यास सर्वांना छायाचित्र पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर त्यांनी ओशिवरा पोलिसांत संबंधित तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सायबर सुरक्षा कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे.सायबर पोलीस सध्या देशभर अशा गुन्ह्यांत सहभागी आरोपींचा शोध घेत आहेत. गेल्या दोन आठवड्यात सायबर पोलिसांनी अ‍ॅप्लिकेशनसाठी वसुली करणाऱ्या चार जणांना अटक केली होती.