मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासनीसला प्रवाशाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात तिकीट तपासनीसाचा शर्ट फाटून त्याच्याकडील दंडाचे दीड हजार रुपयेही गहाळ झाले. मारहाण करणाऱ्या प्रवाशाने नंतर माफीनामा लिहून आणि हरवलेले पैसे परत करून प्रकरण मिटवले. मात्र, बोरिवली रेल्वे पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला.

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार जलद वातानुकूलित लोकलमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग गुरुवारी तिकीट तपासणी करत होते. यावेळी प्रवासी अनिकेत भोसले यांनी सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सिंग यांना शिवीगाळ करून भोसले याने त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे, वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. या मारहाणीत सिंग यांचा शर्ट फाटला. तसेच, त्यांच्याकडील विनातिकीट प्रवाशांकडून दंड म्हणून वसूल केलेले १,५०० रुपयेही गहाळ झाले. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तक्रारीनंतर लोकलमध्ये प्रवेश केला आणि भोसले याला नालासोपारा येथे उतरवण्यात आले.

हेही वाचा – Police Recruitment in December: डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती, राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे

हेही वाचा – Mumbai Monsoon Update : उपनगरांत पावसाचे पुनरागमन, शहरात पावसाची प्रतीक्षा

या घटनेनंतर भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र भोसले याने आपली चूक मान्य करून माफीनामा लिहिला. तसेच, जसबीर सिंग यांचे हरवलेले १,५०० रुपये दिले. भोसले याने लेखी माफी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताकीद देऊन सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.