मुंबई : आशियातील सर्वात मोठे जागतिक क्षमता केंद्र म्हणजेच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) मुंबईत उभारण्यात येणार आहे. त्यातून ४५ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. ‘ब्रुकफिल्ड’ कंपनी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. जगातील आघाडीची ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीही राज्यात मोठी गुंतवणूक करणार असून, महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले.
राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिओ कन्व्हेशन सेंटर येथे ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला, ‘एएनएसआर’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम अहुजा आणि सीईओ, ‘ब्रुकफिल्ड’ कंपनीचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी अंकुर गुप्ता यांच्याबरोबर राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या गुंतवणूक व तांत्रिक भागीदारी प्रकल्पाच्या अनुषंगाने चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी ‘फेडएक्स’ही मुंबई-नवी मुंबई विमानतळ परिसरात ‘जीसीसी’ केंद्र उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने देशात १७.५ अब्ज डाॅलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचाही विचार करावा, अशी विनंती कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान करण्यात आली. त्यांनीही राज्यात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. आगामी काळात ‘मायक्रोसॉफ्ट’ मोठी गुंतवणूक करेल आणि महाराष्ट्राला ‘एआय’चे केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्याला ‘जीसीसी’ केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योगसुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या ‘जीसीसी’ धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धी साधली जाणार आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे गुन्हे नियंत्रण प्रारुप दिशादर्शक
मुख्यमंत्र्यांनी या वेळी ‘मायक्रोसाॅप्ट’ने आयोजित केलेल्या ‘एआय टूर’ कार्यक्रमातही सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारबरोबर विकसित केलेल्या ‘क्राईम एआयओएस प्लॅटफॉर्म’चा प्रारंभ या वेळी केला. ‘एआय’च्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने तयार केलेले प्रारुप देशभरासाठी दिशा देणारे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारने विकसित केलेल्या ‘मार्बल प्लॅटफॉर्म’मुळे सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचा तीन-चार महिन्यांऐवजी केवळ २४ तासांत शोध लावता येतो. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे अधिक गतीमान झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पवईत सर्वात मोठे जीसीसी सेंटर
ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे सहा एकर जागेवर २० लाख चौरस फूट बांधकाम असलेले भव्य ‘जीसीसी’ केंद्र उभारण्याची घोषणा केली. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकांचे आशियातील सर्वात मोठे जीसीसी केंद्र स्थापन केले जाणार आहे. सदर प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणार असून, यामध्ये एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच ४५ हजारहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प एमएमआरडीए व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी १०० टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट आहे.
