मुंबई : मुंबई आणि बिहारला जोडणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपूर एक्सप्रेस, मुंबई आणि झारखंडला जोडणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस-गोड्डा एक्सप्रेसच्या डब्याच्या संरचनेत बदल केला आहे. या बदलामुळे सर्वसामान्याचे डबे असलेल्या दोन शयनयान डब्याची कमी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२३३६ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-भागलपूर एक्स्प्रेसला १२ एप्रिल रोजीपासून, गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला ७ एप्रिल रोजीपासून, गाडी क्रमांक २२३१२ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोड्डा एक्स्प्रेसला ९ एप्रिल रोजीपासून आणि गाडी क्रमांक २२३११ गोड्डा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला १२ एप्रिल रोजीपासून २ वातानुकुलित द्वितीय श्रेणी, ६ वातानुकुलित तृतीय श्रेणी, ७ शयनयान श्रेणी, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार, एक जनरेटर कार तसेच एक द्वितीय श्रेणी आसन व सामान वाहतूक सह गार्ड ब्रेक व्हॅन जोडण्यात येतील. या चार रेल्वेगाड्यांना पूर्वी दोन वातानुकुलित द्वितीय श्रेणी डबा, पाच वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा, ९ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार, एक जनरेटर कार, सामान वाहतूक सह गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना होती. परंतु, २ शयनयान डबे कमी केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.
गाडी क्रमांक १२३३६ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते भागलपुर एक्स्प्रेस ही मुंबई ते बिहारमधील भागलपूरला जोडणारी प्रमुख गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून दोनदा रविवार, मंगळवारी सकाळी ८.०५ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी भागलपूर येथे सायंकाळी ५.५५ वाजता पोहचते. जिचा प्रवास ३३ तासांपेक्षा जास्त वेळेत आणि सुमारे १,९१७ किमी अंतराचा असतो. या रेल्वेगाडीला सुमारे ३८ ते ३९ थांबे आहेत. ज्यात कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, जबलपूर आणि गया यांचा समावेश आहे. ही रेल्वेगाडी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतून जाते.
गाडी क्रमांक २२३१२ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)- गोड्डा अतिजलद एक्स्प्रेस ही मुंबई आणि झारखंडमधील गोड्डा दरम्यान धावणारी साप्ताहिक रेल्वेगाडी आहे. ही रेल्वेगाडी दर गुरुवारी सकाळी ८.०५ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.३५ वाजता पोहोचते. सुमारे २,०२२ किमीचे अंतर ३६ तास ३० मिनिटांत ही रेल्वेगाडी करते. या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, पाटणा, झाझा, जसीडीह, बांका, आणि हंसडीहा या रेल्वे स्थानकावर थांबा घेते.

