Railway Minister Ashwini Vaishnaw Announcement: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी व्यापक रेल्वे विकास आराखडा जाहीर केला आहे. यासाठी त्यांनी २३,९२६ कोटींची अर्थसंकल्पीय रुपरेषा जाहीर केली आहे. यात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, मालवाहतूक कनेक्टिव्हिटी आणि राज्यभरात व्यापक आधुनिकीकरण यांचा समावेश आहे.

हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर

हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणखी गतिमान होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी एकूण २३,९२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. राज्यात आधीच १.७० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. ज्यात आता मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद दरम्यान नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, फ्रेट कॉरिडॉर आणि इतर प्रकल्पांचा समावेश असेल.

मुंबई-पुणे प्रवास ४८ मिनिटांत शक्य

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरित्या कमी होऊन फक्त ४८ मिनिटांवर येईल. त्यामुळे ही दोन शहरे व्यावहारिकदृष्ट्या आणखी जवळ येतील. लोक आपल्या कामांसाठी दोन शहरात सहज प्रवास करू शकतील.

मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वेच्या मार्गाबद्दल पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली. ते म्हणाले, नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबईहून लोणावळा, पुणे, दौंड मार्गे सुरू होईल आणि नंतरचा भाग सिंकदराबादला जोडेल.”

पुणे आणि हैदराबाद ही दोन्ही प्रमुख आयटी, इलेक्टॉनिक्स आणि उत्पादन केंद्र आहेत. या दोन शहरांना हायस्पीड कॉरिडॉर, बुलेट ट्रेनचे जाळ्यानी जोडल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा लाभ होईल. यामुळे या दोन शहरातील प्रवासाचा वेळ केवळ एक तास ५५ मिनिटांवर येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जलद समन्वयामुळे हे शक्य झाल्याचेही रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, या प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात एक किंवा दोन तासांच्या अंतराने रेल्वे धावतील. प्रकल्प एकदा स्थिर झाल्यानंतर बुलेट ट्रेनच्या फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ होईल. टोक्यो ते ओसाका दरम्यान दर १५ ते २० मिनिटांनी बुलेट ट्रेन धावते, याचाही दाखला त्यांनी दिला. अशाच प्रकारची फ्रिक्वेन्सी भारतातही आणण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.