मुंबई : गणेशोत्सव, शिमग्यासह अन्य सणांना मुंबईतून कोकणात, विजयदुर्गला केवळ सात तासांत पोहोचता यावे, यासाठी १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली. मात्र महिन्याभरात प्रतिसादाअभावी आणि तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की सागरी मंडळावर ओढवली. ही सेवा आज सुरू असती तर गणेशोत्सवासाठी अतिजलद आणि कोणत्याही त्रासाशिवाय मुंबईकरांना कोकण गाठता आले असते. पण यंदा गणेशोत्सवासाठी रो-रोने कोकण गाठता येणार नसले तरी पुढच्या गणेशोत्सवाला मात्र कोकणात रो-रोने जाता येणार आहे. कोकणात जाण्यासाठी पुन्हा रो-रो सेवा सुरू करण्याचा घाट सागरी मंडळाने घातला असून, त्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे आता मुंबई ते वेंगुर्ला अशी रो-रो सेवा सुरू होणार असून, यासाठीच्या व्यवहार्यता तपासणीचे काम सुरू आहे. रो-रो सेवेच्या संचालनासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून, वर्षभरात ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे
सागरी मंडळाचे नियोजन आहे. असे झाल्यास मुंबईहून वेंगुर्ला सात ते आठ तासांत गाठता येणार आहे.गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असते की, रस्ते वा रेल्वे मार्गे जाणाऱ्या सर्वांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या काळात कोकण रेल्वेकडून अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडल्या जातात, फेऱ्या वाढवल्या जातात. तर एसटी गाड्यांच्या फेऱ्या आणि संख्या वाढवल्या जातात. मात्र, तरीही ही व्यवस्था कमी पडते. प्रवाशांना कसरत करत कोकण गाठावे लागते. त्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम १८ वर्षांपासून रखडल्याने, पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने, आठ ते दहा तासांच्या रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना १४ तास वा त्यापेक्षाही अधिक वेळ वाया घालवावा लागतो. मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरही या काळात वाहनांची मोठी गर्दी असते. मुंबई – कोकण असा कसरतीचा प्रवास सुकर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने आता अतिजलद प्रवासाचा एक पर्याय मुंबईस्थित कोकणवासीयांसाठी आणला आहे. हा पर्याय म्हणजे रो-रो सेवेचा. त्यानुसार १ मार्चपासून मुंबई – विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू करण्यात आली. ६२६ प्रवासी क्षमतेची एम टू एम प्रिन्सेस बोट मुंबई – विजयदुर्गदरम्यान धावू लागली. मात्र, भरमसाठ तिकीट दरामुळे या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही.
त्यात अवघ्या महिन्याभरातच बोटीत तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर रो-रो सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची वेळ सागरी मंडळावर आली.मुंबई – विजयदुर्ग प्रवासासाठी ३ हजार, ५ हजार, ७ हजार आणि ९ हजार असे प्रवासी तिकीट दर होते. तर दुचाकीसाठी १ हजार, सायकलीसाठी ६०० रुपये आणि चारचाकीसाठी ६ हजार ते ९ हजार रुपये असे दर आकारण्यात आले. विमानसेवा आणि वंदे भारतपेक्षा ही सेवा महागडी असल्याची टीका यावेळी झाली. त्यामुळेच या सेवेच्या महिन्याभरात १२ फेऱ्या झाल्या आणि या १२ फेऱ्यांद्वारे केवळ ८९४ प्रवाशांनी प्रवास केला. तर केवळ १५४ वाहने यातून नेण्यात आली.या सेवेला प्रतिसाद मिळाला नाहीच, पण त्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागला. दरम्यान, बोटीची दुरुस्ती करून लवकर सेवा पुन्हा सुरू करू, असे त्यावेळी सांगण्यात आले. मात्र, अद्यापही सेवा सुरू झालेली नसून, ही सेवा सुरू असती, तर गणेशोत्सवादरम्यान या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असता, असे म्हटले जात आहे.
या पार्श्वभूमीवर सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी रो-रो सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. तर मुंबई – वेंगुर्ला अशी रो-रो सुरू करण्यासाठी व्यवहार्यता तपासणी सुरू असून, विजयदुर्ग, मालवण असे थांबे या सेवेत असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच रो-रो सेवेतील चार कंपन्यांनी या मार्गावर सेवा देण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्यानुसार त्यांच्या प्रस्तावावरही विचार सुरू असून, निविदा प्रक्रियेद्वारे कंपन्यांची नियुक्ती करून रो-रो सेवा सुरू केली जाईल. यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वेंगुर्ला येथे जेट्टी तयार करण्याचे काम सागरी मंडळाकडून सुरू असून, आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आधी रो-रोचा प्रयोग महागड्या तिकीट दरामुळे अयशस्वी ठरला. त्यामुळे परवडणाऱ्या दरात ही सेवा सुरू होणार का, हे पाहणे महत्त्वाचे असेल,
मुंबईहून कोकणासाठी पुन्हा रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल.”- प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ
मुंबई ते वेंगुर्ला अशी रो-रो सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी चार कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. त्यानुसार व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू आहे. ही सेवा सुरू करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ही सेवा सुरू केली जाईल. तर या सेवेचे तिकीट दर प्रवाशांना परवडणारे असतील, याचाही विचार ही सेवा सुरू करताना निश्चित केला जाईल.”- नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री
