मुंबई : मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील पथकर नाक्यांवरील अर्थात वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर पथकर नाक्यांवरील पथकर दरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाढ केली आहे. मिनी बस, एल.सी.व्ही. ट्रक, बस आणि अवजड वाहनांसाठीच्या पथकर दरात १५ ते ३५ रुपयांची वाढ झाली आहे. नवीन पथकर दर गुरुवारी, १ ऑक्टोबरपासून लागू होतील. त्यानुसार आता मिनी बस, एल.सी.व्ही. वाहनांसाठी ९० रुपये, ट्रक, बससाठी १८० रुपये आणि अवजड वाहनांसाठी २२५ रुपये असे पथकर दर गुरुवारपासून लागू होतील.

मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएसआरडीसीकडून मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधण्यात आले. हा खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर अशा पाच पथकर नाक्यांची उभारणी करण्यात आली. ही पथकर वसुली २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने हलक्या वाहनांना, बेस्ट बस, एसटी आणि शालेय वाहनांना पथकर माफी दिली. तेव्हापासून या वाहनांना कोणताही पथकर आगारण्यात येत नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र मिनी बस, एल.सी.व्ही. वाहने, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना पथकर लागू आहे. तर दर तीन वर्षांनी पथकर दरांमध्ये एमएसआरडीसीकडून वाढ केली जाते. त्यानुसार २०२३ मध्ये पथकर दरात वाढ झाली होती. तर आता तीन वर्षांनंतर एमएसआरडीसीकडून पथकर दरात वाढ करण्यात आली आहे. यासंबंधीची जाहिरात सूचना बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली.

एमएसआरडीसीच्या जाहिरात सूचनेनुसार पथकर दरात १५ ते ३५ रुपयांची वाढ करण्यात आली. तर नवीन पथकर दर गुरुवार, १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार आता मिनी बस, एल.सी.व्ही. वाहनांसाठी ७५ रुपयांऐवजी ९० रुपये पथकर आकारला जाईल. ट्रक, बससाठी १५० रुपयांऐवजी १८० रुपये पथकर लागेल आणि अवजड वाहनांना १९० रुपयांऐवजी २२५ रुपये इतका पथकर भरावा लागणार आहे. नवीन दरांनुसार मिनी बस, एल.सी.व्ही वाहनांच्या दरात १५ रुपयांनी, ट्रक,बसच्या दरात ३० रुपयांनी तर अवजड वाहनांच्या दरात ३५ रुपयांनी वाढ झाली आहे.त्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावरील प्रवास आता गुरुवारपासून महागणार आहे.