मुंबई : मुंबई शहरातील वाहनांची संख्या ५४ लाखांच्या घरात पोहोचली असून यात दुचाकींची संख्या सर्वाधिक ३१ लाख आहे. वाहनांमुळे शहरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. सध्या मुंबईतील दर किलोमीटर रस्त्यावर २ हजार ६४८ वाहने आहेत. वाढत्या वाहन संख्येवर सरकारचे कोणतेही बंधन नसताना

शहरात ७० किलोमीटरचे बोगदे विविध प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत आहेत. या बोगद्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल याबाबत मात्र साशंकता आहे. शहरात दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे आहेत. त्यातच जे रस्ते उपलब्ध आहेत,त्यावर कोणते न कोणते काम सुरू असल्याने मार्गिकांची संख्या घटल्याने शहरातील वाहतूक कोंडी वाढत आहे. मुंबईकरांना प्रवासासाठी निश्चित वेळेपेक्षा सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक वेळ लागत आहे. रस्ते आणि वाहनांची संख्या पाहता सकाळी-संध्याकाळी गर्दीच्या वेळी शहरातील प्रत्येक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्या ४० टक्के मुंबईकर स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.

वायू-ध्वनी प्रदूषणात भर

वाहनांमुळे सर्वाधिक वायू प्रदूषण होते. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावते. त्याशिवाय हल्ली प्रत्येकाला घाई असल्याने वाहतूक कोंडीत हाॅर्न वाजविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सतत हाॅर्न वाजविल्याने ध्वनी प्रदूषणात वाढ होते.

वाहनांची घनता

वाहनांच्या घनतेमध्ये इतर शहरांच्या तुलनेत मुंबई आघाडीवर आहे. मुंबईत प्रति किमी रस्त्यावर २,६४८ वाहने आहेत. चेन्नईत १,७६२ ,कोलकाता १,२८३, बेंगळुरू १,१३४ आणि दिल्ली २६१ वाहने आहेत.

मुंबईतील वाहनांची वाढती संख्या

वर्षवाहने
२०२०३९ लाख
२०२१४१ लाख
२०२२४३.५ लाख
२०२३४५.५ लाख
२०२४५० लाख
२०२५ ५३ लाख

कोणत्या शहरात किती किमी रस्ते आणि वाहन संख्या?

शहररस्तेवाहन संख्या
दिल्ली३३ हजार १९८१.५४ कोटी
बंगळूरु१४ हजार१.२ कोटी
चैन्नई२ हजार ७८०६३.५ लाख
मुंबई१ हजार ९४१५३ लाख
पुणे१ हजार ६७३४१.५ लाख
कोलकत्ता४ हजार १८२५ लाख

आर्थिक गणित

मुंबईत खासगी वाहने १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करतात. या वाहनांचे वाहतूक कोंडीत किमान १ लिटर इंधन वाया जाते.त्यामुळे दिवसाला सुमारे १५ लाख लिटर इंधनाचा अपव्यय होतो. मुंबईकरांचे किमान तीन तास वाहतूक कोंडीत जातात. एका मुंबईकराचे दिवसाचे वेतन १ हजार रुपये गृहीत धरले तर सुमारे ७० लाख प्रवाशांचे अंदाजे २१० कोटी रुपये दिवसाला वाया जातात.

७० किमीची बोगद्यांचा उतारा फायदेशीर ठरणार का?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात एकात्मिक बोगद्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. या बोगद्यांमुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल,असा विश्वास एमएमआरडीएला आहे. या ७० किमीच्या बोगद्यांसाठी १.०५ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे.

———————–

१) वांद्रे-वरळी सी लिंक ते मुंबई विमानतळ-टी

२ लांबी: १६ किमी तरतूद : १,१८९ कोटी

२)ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह

लांबी:९.४२ किमी तरतूद : १,२५० कोटी

३) ठाणे ते बोरिवली

लांबी:११.८ किमी

तरतूद :३,०२९.५१ कोटी

सरकारचा खर्चिक प्रकल्पांवर भर

सध्याच्या सरकारचा खर्चिक प्रकल्पांवर जास्त भर आहे. कोणताही प्रकल्प राबविताना त्याचा फायदा किती आणि कसा होणार आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. शहरात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यावर मर्यादा आणणे काळाजी गरज आहे. जोपर्यत वाहनांवर मर्यादा येत नाही, तोपर्यत वाहतुकीची समस्या सुटणार नाही. पुलांपेक्षा बोगदा बांधणे खूपच खर्चिक आहे. पुलावर कोणतेही वाहन प्रवास करू शकते. बोगद्यातून प्रवास करण्यावर मर्यादा असते. भविष्याचा आणि वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून प्रकल्पांची आखणी व्हावी. – ए.व्ही.शेणॉय,वाहतूक तज्ञ.

सार्वजनिक वाहतूकीला प्राधान्य द्या

वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अधिक रस्ते बांधणे ही एक वाईट कल्पना आहे. जगात कुठेही शहरी भागात हे यशस्वी झालेले नाही. यामुळे रस्त्यावर अधिक खाजगी गाड्या येण्यास प्रोत्साहन मिळेल. बेस्ट बस आणि विद्यमान पायाभूत सुविधांवर योग्य गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. वाहतूक कमी करण्यासाठी अधिक रस्ते बांधणे म्हणजे लठ्ठपणाशी लढण्यासाठी पट्टा सैल करण्यासारखे आहे. – स्टॅलिन डी,संचालक, वनशक्ती