मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत बेकायदेशीररित्या फ्लॅशिंग दिवे (डोम लाईट्स) लावलेल्या वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत ८० वाहनांवरील विविध रंगातील फ्लॅशिंग दिवे आणि तीन सायरन जप्त केले. तसेच भविष्यात अशा वाहनांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस आरटीओला करण्यात येणार आहे.

शहरात अलीकडच्या काळात काही खासगी वाहन चालक आणि अनधिकृत व्यक्ती आपल्या वाहनांच्या टपावर बेकायदेशीरपणे लाल, निळे किंवा पिवळे डोम लाईट्स (फ्लॅशिंग दिवे) लावून फिरत असल्याबाबतच्या तक्रारी वारंवार मुंबई वाहतूक पोलिसांकडे येत आहेत. अशा प्रकारच्या दिव्यांचा वापर करून व्हीआयपी असल्याचा बनाव करणे, वाहतूक कोंडीतून बेकायदेशीरपणे मार्ग काढणे आणि सामान्य नागरिकांमध्ये, तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने या गंभीर बाबीची दखल घेत मुंबई वाहतूक पोलिसांनी १ आणि २ एप्रिल रोजी संपूर्ण शहरात अशा बेकायदेशीर डोम लाईट्स लावणाऱ्या वाहनांविरुद्ध एक विशेष मोहीम हाती घेतली होती.

या मोहिमेअंतर्गत सहायक पोलीस आयुक्त, दक्षिण मध्य, मरीन ड्राईव्ह वाहतूक विभाग, वांद्रे वाहतूक विभागाने अनेक वाहनांची तपासणी केली. तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० वाहनांवरील विविध रंगाच्या बेकायदेशीर डोम लाईट्स व तीन सायरन जप्त केले. तसेच, संबंधित वाहन चालक/मालक यांच्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यापुढेही कोणत्याही खासगी किंवा अनधिकृत वाहनावर असे ‘डोम लाईट्स’ किंवा सायरन आढळल्यास, संबंधित वाहनचालक आणि मालकावर मोटार वाहन कायद्यांतर्गत जास्तीत जास्त दंड आकारण्यात येईल. तसेच, गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित वाहनाची नोंदणी रद्द करण्याची शिफारस प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) करून कायदेशीर गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती पोलिस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी दिली.

वाहतूक पोलिसांचे मुंबईकरांना आव्हान

वाहनांवर अनधिकृतपणे कोणतेही फ्लॅशिंग दिवे, डोम लाईट्स किंवा सायरन लावू नयेत. तसेच, शहरात अशा प्रकारे बेकायदेशीर दिवे लावून फिरणारी वाहने नागरिकांच्या निदर्शनास आल्यास, त्याची माहिती वाहनाच्या छायाचित्रासह मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलवर किंवा ट्रॅफिक हेल्पलाईन क्रमांकावर तत्काळ द्यावी. वाहतुकीचे नियम पाळून मुंबईला सुरक्षित ठेवा, असे आवाहन करण्यात आले आहे.