मुंबई : उन्हाळी सुट्टीत विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. इराण – अमेरिका, इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या इंधन दरांमुळे महागलेला विमान प्रवास स्वस्त करण्यासाठी, केंद्र सरकारने देशातील प्रमुख विमानतळांवर लँडिंग आणि पार्किंग शुल्कात २५ टक्क्यांची कपात केली आहे. एरोनॉटिकल टॅरिफमधील ही कपात पुढील तीन महिन्यांसाठी लागू असून, यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत देशांतर्गत विमान तिकीट दरात कपात होण्याची शक्यता आहे.
मुंबईसह देशातील प्रमुख ३४ विमानतळांवर ही शुल्क कपात केली आहे. केंद्र सरकारने याची अंमलबजावणी करण्याचे आदेश एअरपोर्टस् इकोनॉमिक रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाला दिले आहेत. हेच आदेश भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या विमानतळांनाही लागू राहणार आहेत. इंडिगो, एअर इंडिया सारख्या विमान कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्च कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कपातीमुळे विमान कंपन्यांची सुमारे ४०० कोटी रुपयांची बचत अपेक्षित आहे. ज्याचा थेट फायदा तिकीट दर स्वस्त होऊन प्रवाशांना मिळू शकतो. ही कपात केवळ देशांतर्गत उड्डाणांसाठी लागू आहे, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नाही. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख ३४ विमानतळांवर ही कपात लागू असणार आहे.
दर आकारणी कशी होते ?
विमानाचे वजन आणि आकारमान यानुसार लँडिंगचे शुल्क आकारले जाते. सरासरी विचार करता किमान देशांतर्गत मार्गावर साडेपाच हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी होते. तर, आंतरराष्ट्रीय मार्गासाठी किमान २० हजार रुपये शुल्क आकारणी होते. विमानाच्या वजनानुसार आणि वेळेनुसार प्रति तासाप्रमाणे पार्किंग शुल्क आकारण्यात येते.
