मुंबई : वाढलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे शहरात वाढलेली अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, मुंबई वाहतूक पोलिसांनी १ फेब्रुवारीपासून दररोज सकाळी ८ ते सकाळी ११ दरम्यान आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली. परंतु, यावर वाहतूकदार संघटनांनी आक्षेप घेतला असून संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

वाढलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे शहरात अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक रस्ते अरूंद झाले असून, त्याठिकाणीही वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावर अवजड वाहन आल्यास वाहतूक कोंडीत भर पडते. तसेच बांधकामामुळे विविध प्रकारची अवजड वाहने मुंबईच्या रस्त्यावर धावतात. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या कोंडीमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढते. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला.

दक्षिण मुंबईमध्ये हे वाहतूक नियम अधिक कठोर केले आहेत. लक्झरी बससह सर्व अवजड वाहनांवर सकाळी ७ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ पर्यंत प्रवेशबंदी केली आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच परवानगी दिली जाते. तर इतर सर्व अवजड वाहने मध्यरात्रीपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंतच शहरात प्रवेश करू शकतात. पूर्वद्रुतगती महामार्गावर २४ तास अवजड वाहनांवर बंदी घातली आहे. यामध्ये बस आणि काही अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतूकीला वगळले आहे. यामध्ये जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

वाहतूकदारांना संपवण्याचे काम शासन व प्रशासनाकडून सातत्याने सुरू आहे. आता १ फेब्रुवारीपासून आणखी एक घातक नियम लागू करण्यात आला आहे. २९ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्र शासनाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, वाहनावर कोणतेही चलन झाले तर, ४५ दिवसांच्या आत वाहनमालकाने स्वतः विभागाकडे हरकत नोंदवणे बंधनकारक आहे. चलन मान्य नसेल तरीही ५० टक्के रक्कम आधी भरून स्वतः न्यायालयात दाद घ्यावी लागणार आहे. हा नियम म्हणजे वाहतूकदारांच्या गळ्यात घातलेला सरकारी फास आहे. या विषयावर ताबडतोब, गंभीरपणे आणि संघटितपणे भूमिका सर्व वाहतूकदार ठरवतील. याबाबत पूर्ण राज्यभरात आंदोलन करण्याबाबतचा निर्णय घेऊ. – डॉ.बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघ