Mumbai Traffic Police VIP Culture Video: मुंबईतून एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या संतापजनक कृतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत दावा केल्याप्रमाणे व्हीआयपी व्यक्तीच्या वाहनाला मार्ग करुन देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने सायकलवरुन ओझे वाहून नेणाऱ्या व्यक्तीची सायकल अक्षरश: उचलून फेकून दिली. एवढेच नव्हे तर व्हीआयपी व्यक्ती गेल्यानंतर इतर वाहनांसाठी मार्ग बंद करुन दुसऱ्या मार्गाचा वापर करण्यास सांगितले. सध्या हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, व्हीआयपी व्यक्तींना खास वागणूक आणि सामन्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याची चर्चा रंगली आहे.
व्हायरल व्हिडीओ नेमकं काय घडतंय? दावा काय?
समाज माध्यमांवर व्हायरल होणारा हा व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ पी. डी’मेलो रोड, कार्नाक बंदर, मुंबई येथील असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, व्हिडीओच्या घटनास्थळाबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. व्हिडीओत वाहतूक पोलिस कर्मचारी व्हीआयपी व्यक्तीच्या वाहनासाठी रस्त्याच्या मधोमध असणारे पिवळ्या रंगाचे बॅरिकेड्स हटवून यु-टर्न घेण्यासाठी सहकार्य करत आहे. व्हीआयपी व्यक्तीचे वाहन आणि त्यापाठोपाठ एक पोलिस वाहन देखील त्या मार्गातून जाते. यानंतर मागून येणाऱ्या प्रवासी कारला मात्र या पोलिसाने जाण्याची परवानगी न देता सरळ त्याच मार्गाने पुढे जाण्याचा इशारा केल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
खासदार मिलिंद देवरांची पोस्ट
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हीआयपी व्यक्ती कोणीही असो, काम करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या सायकलला अशा प्रकारे ढकलून देणे अयोग्य आहे. प्रत्येक नागरिकाचा सन्मान करायला हवा, असे देवरा यांनी एक्सवर व्हिडीओसह केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात सक्त कारवाई करुन पुन्हा अशी घटना घडणार नाही अशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल
इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स आणि रेडीट या समाज माध्यमांवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, नेटकरी देशातील व्हीआयपी संस्कृतीबाबत मत मांडत आहेत. व्हीआयपी व्यक्तीसाठी सायकलवरुन ओझे वाहून नेणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे ढकलून देणे त्याची सायकल फेकून देणे योग्य नसल्याचे मत नेटकरी मांडत आहेत.
नेटकऱ्यांचा संताप
“भारतात फक्त भ्रष्टाचार कामाला येतो”, अशी उपरोधिक टीका एका नेटकऱ्याने व्हायरल व्हिडीओवर केली आहे. तर, दुसऱ्या एकाने “आपल्याकडे सुधारणा होण्याची चिन्ह नाहीत, हे असचं चालत आलंय आणि असचं सुरु राहिल”, असे म्हणत व्हीआयपी संस्कृतीवर टीका केली.
