मुंबई : वळसा वाचवण्यासाठी, जवळच जायचे आहे अशी कारणे देत ‘शॉर्टकट’ म्हणून विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांमुळे अपघातही होतात. अशा प्रकारांवर नियंत्रण आण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. जानेवारी ते २० ऑगस्टदरम्यान मुंबई वाहतूक पोलिसांनी विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी २१ हजार ६९८ चलान जारी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक ८० टक्के चलान दुचाकी चालकांना बजावले आहे.

मीरा रोड येथील रस्त्यावर मंगळवारी पहाटे चुकीच्या बाजूने गाडी चालवल्याप्रकरणी एका टॅक्सी चालकाला हटकणाऱ्या मीरा-भयंदर महानगरपालिकेच्या ४५ वर्षीय चालकाचा भरधाव वेगात आलेल्या कंटेनरखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे कोंडीत भर पडते. अशातच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमुळे कोंडी वाढते, शिवाय अपघातांनाही निमंत्रण मिळते. यात प्रामुख्याने विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा चालकांना शिस्त लागावी, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एकदिशा मार्गावर, तसेच ‘प्रवेश नसलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने प्रवेश करणे, तसेच मुख्य मार्गिकांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांचा समावेश आहे.

गुन्हे दाखल

विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघात घडल्यास वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. जूनपर्यंत जवळपास एक हजार चालकांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक सुमारे ५०० गुन्हे हे पश्चिम उपनगरात दाखल आहेत.

गेल्या काही महिन्यातील घटना

१५ जुलै – जोगेश्वरी येथे, आठ वर्षांच्या रेवा पवारला चुकीच्या बाजूने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने धडक दिली. रस्त्यावर फरफटत नेल्याने रेवा जखमी होऊन बेशुद्ध झाली होती. आंबोली पोलिसांनी ३० वर्षीय मोटारसायकलस्वार शब्बीर शेख याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. कल्याणच्या या भंगार विक्रेत्याला चार दिवसांनंतर अजमेरमधून अटक करण्यात आली.

१९ ऑगस्ट – एक कंत्राटदाराने सागरी किनारा मार्गावरील बोगद्यात चुकीच्या दिशेने गाडी चालवून इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घातला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कंत्राटदाराकडे वाहन चालविण्याचे लायसन्स नसल्याचे माहीत असतानाही त्याला गाडी चालवू दिल्याबद्दल गाडीच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचा तपशील

कालावधी – चलान संख्या

जानेवारी १ – ऑगस्ट २०,

२०२६ – २१,६९८

२०२५ – ११,७६१

२०२४ – १२,८१४

चालकाला दणका

चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल गुन्हा नोंदवून वाहन जप्त करण्यात येते. चालकाला न्यायालयात सादर केले जाते. परवाने रद्द करण्याची शिफारस केली जाते.

या भागात सर्वाधिक घटना – सहारा रोड, मुलुंड, मालाड, माहीम दर्गा रोड, महाकाली गुंफा रोड, अंधेरी.