मुंबई : मुंबई आणि परिसरांत प्रदूषण वाढत असताना मुंबईच्या रस्त्यांवर खाजगी वाहनांचीच वर्दळ वाढत दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील ५३ लाखांहून अधिक वाहनांच्या लोकसंख्येपैकी जवळपास ८८ टक्के दुचाकी आणि चारचाकी आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्ट बसचे प्रमाण ०.७४ म्हणजेच एक टक्क्यापेक्षा कमी आहे. बेस्टच्या बसच्या घटत्या संख्येमुळे शहरातील रस्त्यावरील बेस्टचा वाटा दिवसेंदिवस कमी होत आहे.
मुंबईतील वाहनांची संख्या २०२३ मध्ये ४५ लाख ३७ हजार २११ आणि २०२४ मध्ये ४७ लाख ५९हजार ९७६ वरून हळूहळू वाढून मार्च २०२५ पर्यंत ५० लाख ५४ हजार ९०७ झाली. सध्या वाहनांची संख्या ५३ लाखांच्या घरात पोहोचली आहे. एकूण वाहनांपैकी दुचाकी (५९.३४ टक्के) आणि चारचाकी, जीप (२८.७२ टक्के) यांचे प्रमाण शहरातील वाहनांपैकी जवळपास ८८ टक्के आहे. उर्वरित वाहनांमध्ये ५.०२ टक्के ऑटोरिक्षा, ३.२७ टक्के टॅक्सी, ०.४२ टक्के मालवाहू वाहने, ०.०२ टक्के ट्रॅक्टर/ट्रेलर आणि २.७२ टक्के इतर वाहनांचा समावेश आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान मुंबईत तीन लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. नवीन नोंदणीकृत वाहनांपैकी ६०.८७ टक्के दुचाकी आहेत. त्यानंतर चारचाकी २३.९४ टक्के, टॅक्सी आणि कॅब ६.२६ टक्के, ऑटोरिक्षा ३.०६ टक्के आणि मालवाहू वाहने ४.४३ टक्के आहेत. एकूण वाहनांपैकी बसचा वाटा ०.७३ टक्के, तर ट्रॅक्टर/ट्रेलर आणि इतर वाहनांचा वाटा अनुक्रमे फक्त ०.०९ टक्के आणि ०.६ टक्के आहे.
सर्वाधिक वाहने पेट्रोलवर
सर्वाधिक ३९.८३ लाख (७८.७९ टक्के) वाहने पेट्रोलवर चालतात, त्यानंतर ५.६३ लाख (११.१५ टक्के) डिझेलवर आणि ४.३६ लाख सीएनजीवर चालतात.
बेस्ट उपक्रम सध्या एकूण २,७६७ बस चालवत आहे. या बसमध्ये बेस्टच्या मालकीच्या अवघ्या २४९ आणि भाडेतत्तावरील २,५१८ बसचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, बेस्टच्या एकूण ताफ्यातील ९१ टक्के बसमध्ये पर्यावरणपूरक सीएनजी आणि विद्युत बसचा समावेश आहे. २०२७ च्या अखेरीस, संपूर्ण बेस्टच्या ताफ्यात विद्युत बस असतील.
एक ट्रिलियन अर्थव्यवस्था राज्याची करायची असेल तर मुंबईची अर्थव्यवस्थ ०.९ ट्रिलियन करावी लागेल.त्यासाठी बेस्टला तारणे अत्यंत आवश्यक आहे. बेस्टची ३५ लाखांची प्रवासी संख्या २३ लाखांवर आली आहे. ती प्रवासी संख्या वाढवून ५० लाख करावी लागणार आहे. शहरी नियोजनाप्रमाणे बेस्टच्या बसची संख्या अडीच हजारांवरुन १० हजार करावी. त्यात साध्या,दुमजली,मिनी,मिडी बसचा समावेश असावा. वातानुकुलित सेवेचा हट्ट नसावा.मुंबईला मारायचे असेल तर लोकल आणि बेस्टची सेवा बंद करावी. सध्या मुंबईकरांची दुसऱ्या क्रमांकाची बेस्टची सेवा आयसीयुमध्ये आहे. -पंकज जोशी, मुख्य संचालक, अर्बन सेटर ,मुंबई.
