मुंबई : मुंबईत सध्या धोकादायक झाडांचा मुद्दा गाजत असून त्यानिमित्ताने महानगरपालिकेच्या कारभारावर मुंबईकरांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, शहरातील वृक्ष संवर्धनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत अद्याप तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली नसल्याची गंभीर बाब नुकतीच समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुका झाल्यांनतर वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यांची निवड झाली. त्या समितीमध्ये वृक्ष तज्ज्ञांचीही नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र, जवळपास सहा महिने उलटले तरीही अद्याप समितीला तज्ज्ञांची प्रतीक्षा आहे.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे दोन स्तरावर काम चालते. पालिका आयुक्तांच्या स्तरावर वृक्ष संवर्धनासंदर्भातील निर्णय घेणारी एक समिती आणि त्या समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी उद्यान अधीक्षकांच्या देखरेखीखालील अधिकारी आणि कर्मचारी असे दोन स्तरावर काम चालते. नियमानुसार आयुक्त स्तरावर असलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये १६ नगरसेवक आणि आठ वृक्ष संवर्धन विषयातील अनुभवी तज्ज्ञ असणे अनिवार्य आहे. शहरातील वृक्षांची नियमितपणे देखरेख, अभ्यास आणि त्याबाबतीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे विविध प्रकारच्या उपाययोजना सुचविणे हे या समितीचे प्रमुख काम आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या वार्षिक खर्चासाठीचे अंदाजपत्रक, वृक्ष प्राधिकरणाद्वारे केल्या जाणाऱ्या कामांवर देखरेख आणि नियंत्रण, नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांवर विचार करून वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये विविध सूचनांची योग्य प्रकारे दखल घेतली जाईल अशा नियमांची तरतूद करणे आदी विविध कामे समितीद्वारे केली जातात. महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांची मोठी फौज, तसेच विभाग स्तरावरील अधिकारीही याच वृक्ष प्राधिकरणाच्या तरतुदींअंतर्गत काम करत असतात. मात्र, सध्या वृक्ष प्राधिकरणात अत्यंत अनागोंदी कारभार सुरू आहे. गेली अनेक वर्ष वृक्ष प्राधिकरण हे केवळ नाममात्र कागदोपत्री चालणारी व्यवस्था बनली आहे, अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबईत वैश्विक तापमान वाढ आणि ऋतू बदलांचे वृक्षांवर होणारे परिणाम समजून घेऊन त्यावर अद्याप उपाययोजना केली गेलेली नाही. झाडांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रचलित पद्धती तसेच काही नवीन प्रकारच्या उपाययोजना अंमलात आणण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नसल्याने वृक्षांचे उन्मळून पडणे, काही प्रजातीच्या वृक्षांची अनिर्बंध प्रकारे वाढ झाल्यामुळे त्यांच्या फांद्या तुटून पडणे, असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे प्राधिकरणात तज्ज्ञांची नेमणूक करणे आवश्यक आहे, असे मत वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य आणि वृक्ष तज्ज्ञ डॉ. अविनाश कुबल यांनी व्यक्त केले.