मुंबई : मुंबईत झाड पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून त्यामुळे यंदा चार जणांचे निष्पाप जीव गेले. या पार्श्वभूमीवर संबंधित घटनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना आखण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ अभ्यासगट स्थापन करावा, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
चेंबूरमध्ये ३० जून रोजी शाळेच्या बसवर झाड पडून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यांनतर ५ जुलै रोजी झाड पडून गंभीर जखमी झालेल्या दोघांचे नाहक बळी गेले. झाड पडल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. २ जुलै रोजी देखील सांताक्रुझ येथे झाड पडून आठ कामगार जखमी झाले होते. त्यांनतर सोमवारी जोगेश्वरी येथे झाड पडून सातजण जखमी झाले.
सातत्याने वाढत असलेल्या या घटनांकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून न पाहता त्यामागील वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि व्यवस्थापनाशी संबंधित कारणांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे,असे मत बन यांनी व्यक्त केले आहे. याबाबत महापालिका आयुक्तांसह त्यांनी महापौर रितू तावडे यांनाही पत्र पाठवून याप्रकरणी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पर्यावरणतज्ज्ञ, वृक्षतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, मृदाशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ, आयआयटी मुंबई, वन विभाग, महापालिकेचा उद्यान विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला स्वतंत्र उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करून त्याच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
अतिवृष्टी, सोसाट्याच्या वारा, सिमेंट – काँक्रिटीकरण, भूमिगत पायाभूत सुविधांचा परिणाम, अयोग्य छाटणी, वृक्षांचे वाढते वय, कीड तसेच मातीची पकड कमी होणे यांसारख्या विविध कारणांचा झाडांवर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. वृक्षसंवर्धन आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबी समान महत्त्वाच्या असून, वैज्ञानिक वृक्ष व्यवस्थापनाच्या माध्यमातून भविष्यात अशा घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.
