मुंबई : काँक्रिटीकरणामुळे झाडे पडली हा मुद्दा पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी फेटाळून लावला असताना, शहरातील वाढते काँक्रिटीकरण हे झाडे उन्मळून पडण्यामागील प्रमुख कारण असल्याचे मत महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईत गेल्या पाच सहा दिवसांत मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्यामुळे रस्त्यांच्या वाढत्या काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. काँक्रिटीकरणामुळे झाडे पडली हा मुद्दा पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी फेटाळला होता. महापौर रितू तावडे यांनी मात्र बुधवारी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना, झाडे पडण्याच्या घटनांसाठी केवळ वृक्षछाटणीला जबाबदार धरणे योग्य नसून, शहरातील वाढते काँक्रिटीकरण हे झाडे उन्मळून पडण्यामागील प्रमुख कारण आहे.

गेल्या आठ दिवसांत मुंबईत तब्बल ८०० हून अधिक झाडे कोसळली आहेत. तीन जणांचा मृत्यू झाडे अंगावर पडल्याने झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, पेव्हर ब्लॉक आणि इतर विकासकामांमुळे अनेक झाडांच्या मुळांभोवती काँक्रिटचे आवरण तयार झाले आहे. त्यामुळे मुळांना आवश्यक असलेली माती, हवा आणि पाणी मिळत नाही.

परिणामी, बाहेरून मजबूत दिसणारी झाडे आतून कमकुवत होत असून, जोरदार वारे आणि मुसळधार पावसात ती मुळासकट उन्मळून पडत आहेत. या पार्श्वभूमीवर झाडांच्या बुंध्याभोवतीचे काँक्रिट हटवून तेथे मातीचे आळे तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, पावसाळ्यापूर्वी महापालिकेने १ लाख ३ हजार झाडांची नियमानुसार छाटणी केली असल्याचे सांगत, झाड पडले म्हणजे छाटणी झाली नव्हती, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. वाकलेल्या किंवा धोकादायक स्थितीतील झाडांचे गुगल मॅपिंग करण्यात आले असून, त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचेही महापौरांनी सांगितले.