मुंबई : मुंबईत सहा दिवसात झाड पडून तीन निष्पाप जीवांचे बळी गेल्यानंतर महानगरपालिकेवर चहूबाजूने टीकेची झोड उठत आहे. शहराला हिरवाईची कवचकुंडले देणारी झाडेच आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज देत असल्याचे चित्र आहे. सिमेंट – काँक्रिटीकरणाच्या विळख्यात अडकलेल्या झाडांना पुरेशी हवा – पाणी, प्राणवायू मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य बिघडू लागले आहे. झाडांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, अशास्त्रीय पध्दतीची वृक्षछाटणी, झाडांवर केली जाणारी रासायनिक प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याशी वारंवार होणारे खोदकाम, अपुरी जागा आदींमुळे मुंबईतील झाडे उन्मळून पडत आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेची किंमत सामान्यांना जीव गमावून द्यावी लागत आहे.

मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी रस्ते – काँक्रिटीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करून अनेक पर्यावरणप्रेमींनी काँक्रिटीकरणाला विरोध केला. मात्र, त्याला न जुमानता पालिकेने प्रकल्पाची अंमलबजावणी केली. दरम्यान, या प्रक्रियेदरम्यान हजारो झाडांच्या बुंध्याशी काँक्रिटीकरण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेवर कडवी टीका होऊ लागली. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी केवळ पाच टक्के झाडांभोवतीचे काँक्रिटीकरण हटविण्याचे काम शिल्लक असल्याचा दावा केला होता. मात्र, अद्यापही मुंबईत अनेक झाडे काँक्रिटीकरणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही झाडांच्या बुंध्याशी डांबरीकरण झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले. तसेच, अंधेरी, दादरमधील गोखले रस्ता, चेंबूर, कुर्ला, गोवंडी, विलेपार्ले, बोरिवली, गोरेगाव, मालाड आदी अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्याशी काँक्रीटीकरण झाल्याचे चित्र आहे. महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षछाटणीचे काम हाती घेते. प्रत्येक प्रजातीच्या झाडाची वेगळी गरज असते. त्यानुसार तज्ज्ञ नेमून सर्वेक्षण करून झाडांची छाटणी होणे गरजेचे असते. मात्र, पालिका सरसकट झाडे छाटून टाकत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी गॉडफ्रे पिमेंटा यांनी केला.

मुंबईतील बहुतांश ठिकाणे चिंचोळ्या जागेत असल्यामुळे झाडांमधून हवा आरपार होईल, अशा पद्धतीने छाटणी होणे आवश्यक असते. मात्र, पालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या छाटणीमुळे हवा अडवली जाते. परिणामी वाऱ्याचा जोर सहन होत नसल्याने झाड कोसळते, असे वृक्ष तज्ज्ञांनी सांगितले. तसेच, काँक्रिटीकरणात झाडाची योग्य काळजी न घेतल्यास झाड कालांतराने कुजू लागते. अनेकदा ते वरून मजबूत दिसत असले तरीही आतून पोकळ, अशक्त होते आणि सोसाट्याच्या वारा, मुसळधार पावसात पडते. अभ्यास न करता केलेली वृक्षलागवडही धोकादायक ठरते. अनेक वेळा काही दुकानदार, सोसायट्या रासायनिक प्रक्रियेद्वारे झाडाला मारण्याचा प्रयत्न करतात. झाड मारण्यासाठी विशिष्ट रसायन नसते. तणनाशकांचा अतिरेकी वापर करून झाड संपवले जाते, असे वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी सांगितले. वारंवार मुळांपाशी होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळेही मुळांचे नुकसान होते आणि झाडाचे आतून आरोग्य बिघडत जाते, असेही ते म्हणाले.

जेवढी वेगाने वाढ ; तितकेच कमकुवत

तसेच, आंबा, वड, पिंपळ ही देशी झाडे पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. ज्या झाडांची वाढ वेगाने होते, तेवढेच ते कमकुवत असते. सोनमोहोर, सुबाभूळ, टॅबेबिया, स्पॅथोडिया, कॉपरपॉड, अंब्रेला ट्री आदी विविध परदेशी झाडे मुंबईत सर्रास दिसून येतात. ही झाडे देशी प्रजातीच्या झाडांच्या तुलनेत अत्यंत कमकुवत असतात. सोसाट्याच्या वारा व मुसलाधर पावसात यांचे पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे देशी झाडांच्या लागवडीवर अधिक भर द्यायला हवा, असे मत राणे यांनी व्यक्त केले.

झाड पडणे ही एका दिवसातील घटना नाही. त्यामागे मोठा कालावधी असतो. मुंबईतील सर्व झाडांचे वैज्ञानिक मूल्यमापन करण्यात यावे. त्यामुळे झाडांचे जोखमीच्या पातळीनुसार वर्गीकरण होईल आणि अतिजोखमीच्या झाडांवरच प्राधान्याने लक्ष केंद्रित करता येईल. ही तयारी पावसाळ्याच्या अनेक महिने आधी करायला हवी. साधारण डिसेंबरपर्यंत अहवाल हातात असल्यास पावसाळ्यात झाड पडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. तसेच, पदपथांवरील बहुतांश झाडे भलीमोठी असतात. त्यामुळे त्यांना एक मीटर जागा अपुरी पडते. झाडांसाठी पदपथालगत सलग मातीचा पट्टा तयार केल्यास झाडे अधिक मजबूत होतील. – विवेक राणे, वृक्ष तज्ज्ञ

न्यायालयात पालिकेचे पितळ उघडे

पालिकेच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत नुकतेच याचिकाकर्ते सागर उगले यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका अधिकारी व उगले यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण सात प्रभागांमध्ये ३५ पेक्षा अधिक रस्ते व ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत एकूण ८३२ झाडांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३२१ झाडांभोवती पुरेशी जागा नसल्याचे आढळले, तर ४७१ झाडांबाबत वैज्ञानिक आणि वेळबद्ध उपाययोजना आवश्यकता स्पष्ट झाले.