मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात झाडे पडली. त्यानंतर आता झाडांच्या बुंध्यांलगत करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, काँक्रिटीकरणामुळे झाडे पडली नसून रस्त्यांचे काँक्रिटीकरण वाहनांच्या येण्या – जाण्याच्या मार्गावर केले जाते. झाडे पदपथावर असतात, असा दावा महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केला. मात्र, हा दावा अर्धसत्य आहे, अस आक्षेप वृक्षतज्ज्ञांनी घेतला आहे. रस्त्यांवरील काँक्रीटीकरणामुळे झाडांना थेट इजा होत नसली, तरी पदपथांवरील झाडांच्या बुंध्यांलगत झालेले काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक आणि डांबरीकरण यामुळे झाडांच्या मुळांवर परिणाम होऊन त्यांचे आरोग्य बिघडत असल्याचे वृक्ष तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

झाड पडून मृत्यू होण्याच्या घटनांमुळे धोकादायक झाडांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागील आठवड्यात झाड पडून तीन निष्पाप बळी गेल्यानंतर शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांमध्ये जखमींचीही संख्या चिंताजनक आहे. मात्र, असे असूनही महानगरपालिका प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. महापालिका आयुक्तांनी काँक्रिटीकरणाबाबत केलेला दावा महापौर रितू तावडे यांनीही फेटाळला. तसेच, काँक्रीटीकारणामुळेच झाडे पडण्याचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी कबूल केले. या पार्श्वभूमीवर वृक्ष तज्ज्ञांनी आपापली मते व्यक्त करताना झाडे पडण्यामागील विविध कारणांवर प्रकाश टाकला. तसेच, झाडांचे संवर्धन अधिक चांगले कसे करता येईल, हे देखील सांगितले.

झाडांच्या बुंध्याभोवती माती असणे अपेक्षित असताना मुंबईत अनेक झाडे सिमेंट – काँक्रिट, डांबर, पेव्हर ब्लॉकच्या विळख्यात अडकली आहेत. त्यामुळे झाडांना प्राणवायू, पाणी मिळत नसून त्यांचे आरोग्य बिघडू लागल्याचा दावा वृक्षतज्ज्ञ डॉ. अविनाश कुबल यांनी केला. वायुविजन योग्यरित्या होत नसल्याने झाडांची वाढ खुंटते. तसेच प्रत्येक प्रजातीच्या झाडाचा पर्णसंभार वेगवेगळा असल्याने त्यांच्या छाटणीसाठी एकच पद्धत अवलंबणे धोकादायक ठरते. अनेक वेळा अयोग्य छाटणीमुळे झाडाचा समतोल बिघडतो आणि कालांतराने ते पडते, असेही कुबल म्हणाले.

तसेच, शहरातील अनेक रस्त्यांलगतची झाडे जुनी झाली असून त्यामध्ये बुरशीजन्य संसर्ग, वाळवीचा प्रादुर्भाव, खोडातील पोकळी अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच, काँक्रीटीकरण, मेट्रो, जलवाहिन्या आणि इतर पायाभूत प्रकल्पांसाठी होणारे उत्खनन यामुळेही झाडांच्या मुळांचे नुकसान होत असल्याचे वृक्ष तज्ज्ञ डॉ. सुचंद्रा दत्ता यांनी सांगितले.

मुंबईतील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ती झाडे प्रदुषणाचा तुलनेने अधिक सामना करत आहेत. त्यामुळे मुंबईच्या वातावरणाला सुसंगत झाडे लावण्याबरोबरच मजबूत झाडाची निवड करणे सुरक्षित ठरेल. त्यामुळे झाड पडण्याचे प्रमाण कमी होण्याची सकारात्मक बाब पर्यावरण अभियंता सुयोग सेठ यांनी अधोरेखित केली.

दरम्यान, जमिनीचा रीतसर अभ्यास न करता काही राजकीय मंडळींकडून केवळ प्रसिद्धीसाठी केल्या जाणाऱ्या वृक्षलागवडीवरही कुबल यांनी टीका केली. प्रत्येक जमिनीचा पोत वेगळा असतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार झाडे लावणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, सध्या मुंबईत रासायनिक प्रक्रियांद्वारे झाडांची कत्तल करण्याचे प्रकार सुरू आहेत. झाडात विषारी पदार्थ टाकल्यानंतर कालांतराने झाड सुकते आणि पडते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरात कोणतेही सुकलेले झाड पडल्यास त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरवर्षी ”ट्री रिस्क असेसमेंट” करणे आणि जीआयएस आधारित डिजिटल वृक्षनोंदणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच प्रमाणित वृक्षतज्ज्ञांच्या देखरेखीखाली शास्त्रोक्त छाटणी, पावसाळ्यापूर्वी ड्रोनच्या साहाय्याने तपासणी आणि नियमित प्रतिबंधात्मक देखभाल करण्यावरही भर दिला पाहिजे. धोकादायक झाडांची माहिती नागरिकांना मोबाइल ॲपद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास झाडांमुळे होणारी जीवितहानी टळण्याची शक्यता डॉ. दत्ता यांनी व्यक्त केली.

अजूनही वेळ गेलेली नाही…

मुंबईत अयोग्य छाटणी, मुळांपाशी होणारे खोदकाम, काँक्रीटीकरण आदी विविध कारणांमुळे झाडे कमकुवत होत आहेत. तसेच, मुळे कुजून झाडे आतून पोकळ होत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही झाडे वाचविणे शक्य आहे. काही नवीन विकसित पद्धतींचा अवलंब करून झाडांची मुळे मजबूत करणे शक्य आहे. त्याची महापालिकेने प्रभावी अंमलबजावणी करावी. केवळ प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय अनास्था यामुळे शहरातील झाडांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे, असा आरोप डॉ. कुबल यांनी केला.

झाडमाफियांना लगाम घालणे आवश्यक

पूर्वी मुंबईत झाडांचे लाकूड विकण्यास परवानगी नव्हती. मात्र, गेल्या काही वर्षांपूर्वी प्रशासनाने नव्या नियमानुसार लाकूड विकण्यास परवानगी दिली. त्यानंतर, शहरात गैरसमज पसरवून ६०० – ७०० ”रेन ट्री” तोडण्यात आले, असे परिस्थितीकी तज्ज्ञ आनंद पेंढारकर यांनी सांगितले. लाकडांच्या विक्रीसाठी आता मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येत आहेत. झाड माफियांवर लगाम घालणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमुद केले. दरम्यान, प्रगत देशांमध्ये प्रत्येक माणसामध्ये १५-२०-२५ झाडे आहेत. मात्र, मुंबईत सात माणसांमागे एक झाड आहे. काही भागात झाडांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, मुंबईत अनेक रस्त्यांवर विविध परदेशी झाडे लावली जातात. ती कमकुवत असतात आणि त्यांच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पडण्याचा धोका अधिक असतो. रस्त्यांवर लहान, मोठी देशी झाडे लावल्यास वारा खेळता राहतो, असेही पेंढारकर म्हणाले.

नागरिकांनीच आता पुढाकार घ्यावा

मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडांच्या बुंध्याशी सिमेंट – काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन झाडे डांबरीकरण, काँक्रीटीकरणाच्या विळख्यातून सोडवावीत. त्यासाठी मोठी जनचळवळ सुरू होणे गरजेचे आहे. तसेच, एखाद्या ठिकाणचे झाड पडल्यास त्याच ठिकाणी पुन्हा झाड लावण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घ्यावी. नागरिकांच्या पुढाकाराशिवाय झाडांचा जीव वाचविणे अवघड आहे, असे मत डॉ. कुबल यांनी व्यक्त केले.