मुंबई : मुंबईमधील मध्य रेल्वे मार्गिकेचा विस्तार, विविध ठिकाणच्या इमारतींचा पुनर्विकास आणि कर्मचारी भवनाआड येणाऱ्या १,३११ झाडांवर गंडांतर येणार आहे. यापैकी ६१० वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार असून ७०१ वृक्ष मूळ ठिकाणांहून हटवून काहींचे पुनर्रोपण करण्याचा मानस आहे. या १,३११ वृक्षांच्या बदल्यात संबंधितांना २० हजार ११९ झाडांची लागवड करावी लागणार आहे. या वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात किती झाडांची लागवड होणार, त्यांची कोण, कशी देखभाल करणार हे मुद्दे अनुत्तरितच आहेत.

मोठा गाजावाजा करीत वृक्ष लागवड, संवर्धनाचा संकल्प सोडणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण या संदर्भात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या आवारातील जुने बांधकाम पाडून त्या जागी कर्मचारी भवन प्रस्तावित आहे. त्यासाठी ५० वृक्ष हटवावे लागणार असून त्यापैकी २८ वृक्ष कापावे, तर २२ वृक्ष पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. या ५० वृक्षांच्या बदल्यात नुकसानभरपाई म्हणून १,११० झाडांची लागवड करावी लागणार आहे. या वृक्षांची वन विकास महामंडळामार्फत आरोग्य पायाभूत सुविधा केंद्राच्या (एचआयसी) माध्यमातून लागवड करण्यात येणार आहे. मात्र या झाडांची लागवड कुठे करणार हे गुलदस्त्यात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप संकुलात २००० दशलक्ष लिटर क्लिअर वॉटर पंपिंग स्टेशनच्या विकासाआड ३३४ वृक्ष अडसर ठरले आहेत. यापैकी १८४ वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार असून १५० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा मानस आहे. या बदल्यात ठाणे विभागातील बदलापूर वन परिक्षेत्रातील मौजे आंभा येथे ४,७२० झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

विक्रोळीमधील कन्नमवार नगर येथील म्हाडा कॉलनीतील १० इमारतींचा पुनर्विकास प्रस्तावित असून या पुनर्विकासात ६५ झाडे अडथळा ठरत आहेत. यापैकी २२ झाडे कापावी लागणार असून ६५ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. या बदल्यात त्याच ठिकाणी १,१८७ झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेच्या बांधकामात ४२ वृक्ष अडचणीचे ठरले आहेत. यापैकी २९ वृक्ष कापावे लागणार असून १३ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्तावित आहे. त्या बदल्यात ८९६ झाडांची लागवड करावी लागणार आहे. ही वृक्ष लागवड लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकाच्या यार्डामध्ये करण्यात येणार आहे. बोरिवली (वृक्ष ४९), मलबार- खंबाला व्हिलेज (१२८), विलेपार्ले (४०), गोरेगाव (३७), आक्सा (७५), जोगेश्वरी- ओशिवरा (६६), बीएआरसी ट्रॉम्बे (७१), विक्रोळीमधील स्मशानभूमी पुनर्विकास (१०), घाटकोपरमधील किरोळे येथील स्मशानभूमी (चार), चेंबूर (दोन इमारतींच्या पुनर्विकासात अनुक्रमे ७५ आणि २६५) येथील इमारतींच्या पुनर्विकासात तब्बल ७७१ पैकी काही झाडांवर कुऱ्हाड चालवावी लागणार आहे. तर काही झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बदल्यात १२ हजार २०६ झाडांची लागवड करावी लागणार आहे. या इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या काही विकासकांनी बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, तर काहींनी गोरेगावमधील आरे कॉलनीच्या हद्दीत नुकसानभरपाई म्हणून झाडांची लागवड करण्याची तयारी दर्शविली आहे. तर काही विकासकांनी काही झाडांची प्रकल्पस्थळी, तर काही झाडांची अन्यत्र लागवड करण्याचे प्रस्तावित केले आहे. दरम्यान, या संदर्भातील प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत सादर होणार आहेत.