मुंबई : ई आणि क्विक कॉमर्स क्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. ग्राहकांना किराणा, अन्नपदार्थ, औषधे किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू काही मिनिटांत घरपोच मिळतात. या वेगवान सेवेमागे झेप्टो, स्विगी, इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि झोमॅटो कंपन्यांचे नियोजन महत्त्वाचे असले तरी दुचाकीवरील वाहतूक महत्वाची आहे. त्यातूनच मुंबईसह देशात दुचाकीच्या विक्रीत वाढ होत आहे. सध्या मुंबईत ५३ लाख वाहने आहेत. त्यापैकी सुमारे ६० टक्के म्हणजेच ३५ लाख दुचाकी आहेत.

शहरी भागातील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आणि कमी वेळेत सामान पोहोचवण्याची गरज लक्षात घेता दुचाकी, स्कूटर्स हा सर्वात प्रभावी पर्याय ठरत आहे. चारचाकीच्या तुलनेत दुचाकीचा इंधन आणि देखभाल खर्च कमी असतो. तसेच पार्किंगसाठी जागा कमी लागते. त्यामुळे डिलिव्हरी पार्टनर्ससाठी दुचाकी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात. दुचाकी वाहनांची इंधन कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि माल वाहून नेण्याची क्षमता डिलिव्हरी व्यवसायासाठी उपयुक्त ठरते. विशेषतः क्विक कॉमर्स कंपन्यांच्या १० ते २० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमध्ये दुचाकी स्कूटर्सची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. दुचाकीमुळे कमी वेळेत अधिक ऑर्डर्स पूर्ण करता येतात.

विद्युत वाहनांना पसंती

पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक डिलिव्हरी कंपन्या विद्युत दुचाकीकडे वळत आहेत. यामुळे ऑपरेटिंग खर्च कमी होत असून कार्बन उत्सर्जनातही घट होत आहे. एकूणच, दुचाकीमुळे डिलिव्हरी अॅप्सच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. भारतातील डिलिव्हरी उद्योगाच्या वाढीमध्ये दुचाकी क्षेत्राचा वाटा येणाऱ्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दिवसेंदिवस गिग वर्कर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०२०-२१ पासून दरवर्षी अंदाजे दुप्पट वेगाने गिग वर्कर्सची संख्या वाढत असून, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि टू-व्हीलर्सचा खपही वाढला आहे. राज्यातील गिग वर्कर्सची लोकसंख्येतील नेमकी संख्या आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी त्यांची अधिकृत नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे.- डॉ. केशव नाना क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच

राज्यातील दुचाकीचा आलेख

वर्ष – मोटारसायकल – स्कूटर – मोपेड – एकूण

२०२०-२१ – १०,९७,८७१ – १,२६,६१२ – २०,१२९ – १२,४४,६१२ २०२१-२२ – ११,३५,०६३ – १,२७,११३ – १९,९८१ – १२,८२,१५७

२०२२-२३ – १४,१७,६१३ – २,१९,२३० – १६,९९६ – १६,५३,८३९ २०२३-२४ – १४,७१,६२९ – २,९०,२०५ – २६,४९८ – १७,८९,३३२

२०२४-२५ – १६,७८,६९४ – ३,४७,०९३ – २३,६५२ – २०,४९,४३९

मुंबईतील दुचाकींची संख्या वर्ष—–दुचाकी

२०२०—–२३.५ लाख २०२१—-२५ लाख

२०२२—-२६.३ लाख २०२३—–२६.५ लाख

२०२४—२९ लाख २०२५—३२ लाख

२०२६——३५ लाख