Mumbai Vegetable Market Fashion Show : फॅशन शो म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो भव्य रॅम्प, आकर्षक रोषणाई, महागडे डिझायनर कपडे आणि मॉडेल्सचा जलवा. मात्र, मुंबईतील वसईमध्ये एका अनोख्या फॅशन शोने या संकल्पनेलाच वेगळं वळण दिलं आहे. इथे ना भव्य स्टेज, ना झगमगाट; तर चक्क भाजी मंडईच्या अरुंद गल्ल्यांमध्ये मॉडेल्सनी कॅटवॉक केला. विशेष म्हणजे, या मॉडेल्सच्या हातात महागड्या ॲक्सेसरीजऐवजी मुळा, कोथिंबीर आणि बाजारात सहज मिळणाऱ्या भाज्या होत्या. या अनोख्या फॅशन शोचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
भाजी मंडईतच उभारला फॅशन शोचा रॅम्प
‘व्हिजन व्होग फॅशन वीक’ असं या अनोख्या फॅशन शोचं नाव आहे. मुंबईतील फॅशन मेंटॉर आणि मॉडेल साहिल सिंह यांनी या संकल्पनेची आखणी केली. नेहमीच्या फॅशन शोला देशी अंदाज देत त्यांनी वसईतील गजबजलेल्या भाजी मंडईला चक्क रॅम्पमध्ये रूपांतरित केलं.
साहिल सिंह यांनी इन्स्टाग्रामवर या फॅशन शोचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तरुण-तरुणी भाजी मंडईतील गर्दीच्या गल्ल्यांमधून आत्मविश्वासाने कॅटवॉक करताना दिसतात. आजूबाजूला भाजी विक्रेते, ग्राहक आणि भाज्यांचे स्टॉल असतानाही मॉडेल्स अगदी एखाद्या मोठ्या फॅशन शोमध्ये सहभागी झाल्याप्रमाणे चालताना दिसतात.
ॲक्सेसरीज म्हणून मुळा अन् कोथिंबीर
या फॅशन शोमधील सर्वांत लक्षवेधी गोष्ट म्हणजे मॉडेल्सनी वापरलेल्या ॲक्सेसरीज. एका मॉडेलच्या हातात मुळा दिसतो, तर दुसरीने कोथिंबिरीची जुडी हातात घेतली आहे. काही मॉडेल्सनी त्यांच्या स्टायलिश कपड्यांसोबत बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर केला, त्यामुळे नेहमीच्या फॅशन शोमध्ये दिसणाऱ्या महागड्या ॲक्सेसरीजऐवजी इथे रोजच्या बाजारातील वस्तूंनीच लक्ष वेधून घेतलं. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीला ‘स्वामी परदेश’ या पहाडी गाण्याची ट्रेंडिंग धून ऐकू येते, त्यामुळे या फॅशन शोला आणखी एक वेगळा स्थानिक रंग चढला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
या संकल्पनेमागे व्होगपासून प्रेरणा असल्याचं साहिल सिंह यांनी सांगितलं. मात्र, महागडे कपडे किंवा प्रसिद्ध डिझायनर ब्रँड यांपेक्षा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि उपलब्ध वस्तूंमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यावर या फॅशन शोमध्ये भर देण्यात आला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या अनोख्या कल्पनेचं कौतुक केलं आहे. भाजी मंडईतून मुळा आणि कोथिंबीर घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना अचानक फॅशन शो पाहायला मिळाला, अशा आशयाच्या मिश्कील प्रतिक्रियाही या व्हिडीओवर उमटत आहेत. नेहमीच्या फॅशन शोपेक्षा अगदी वेगळ्या अंदाजातील या ‘व्हिजन व्होग फॅशन वीक’ने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
