मुंबई : मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही अंतिम मुदतवाढ असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

मुंबई विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीची लिंक ३० जून रोजी बंद केली. लिंक बंद झाल्यानंतरही मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी महाविद्यालयांकडे प्रवेशाबाबत विचारणा करत होते. मात्र प्रवेशपूर्व नोंदणी लिंक बंद झाल्याने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नव्हते. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. त्यामुळे विद्यार्थी व महाविद्यालयांकडून मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे प्रवेशपूर्व नोंदणी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात यांनीही कुलगुरूंना यासंदर्भात निवेदन देत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व त्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालयांना १५ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. सर्व महाविद्यालयांनी १५ जुलैपर्यंत विद्यापीठाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्याची ही शेवटची संधी असणार आहे.

चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश असलेली ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमांसाठी https://muugadmission.samarth.edu.in आणि पदव्युत्तर व चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांसाठी https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्या महाविद्यालयांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरणे अनिवार्य आहे.

पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देऊन जागा रिक्त राहिल्यास महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे, असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.